कोरोना रुग्णसंख्येत भारत आता जगात दुसर्‍या स्थानी

0
284

कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारताने आता ब्राझीलला मागे टाकले असून सध्या भारत हा अमेरिकेनंतर जगातील दुसरा सर्वांत मोठा कोरोनाग्रस्त देश बनला आहे. सतत दुसर्‍या दिवशी काल नव्वद हजारांवर नवे कोरोनारुग्ण भारतात आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ४२ लाखांवर पोहोचली आहे. अमेरिकेत ६२ लाखांहून अधिक रुग्णसंख्या असून मृतांची संख्या एक लाख ८८ हजारांवर गेली आहे.

सध्या कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण भारतात ७७.३० टक्के आहे. एकूण रुग्ण ४२ लाख ४ हजार ६१३ असून मृतांची संख्या ७१,६४२ बनली आहे. गेल्या २४ तासांत १०२६ जणांचा कोरोनाने देशात मृत्यू झाला.

दरम्यान, दिल्ली व बेंगलुरूतील मेट्रो सेवा कालपासून सुरू झाली.
देशाच्या काही भागात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचे दिसत असल्याची माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.

रशियाच्या लशीची
भारतातही चाचणी

रशियाच्या स्पुतनिक फाईव्ह या कोरोनावरील लशीची वैद्यकीय चाचणी या महिन्यात भारतासह सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, फिलिपीन्स आणि ब्राझीलमध्ये सुरू होणार आहे. रशियाच्या थेट गुंतवणूक निधीचे प्रमुख किरिल दिमित्रीएव्ह यांनी ही माहिती दिली. या लशीच्या तिसर्‍या टप्प्याचे प्राथमिक निष्कर्ष ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान प्रकाशित होतील असे ते म्हणाले.

अशी वाढली रुग्णसंख्या
७ ऑगस्ट – २० लाख
२३ ऑगस्ट – ३० लाख
५ सप्टेंबर – ४० लाख