कोरोना बळींच्या संख्येत घट सुरूच

0
150

>> १३ बळी; ४१८ कोरोनाबाधितांची नोंद; ११६२ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात चोवीस तासांत नवे ४१८ कोरोनाबाधित आढळून आले असून, आणखी १३ कोरोना रुग्णांच्या बळींची नोंद झाली आहे. नवे कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १५.२२ टक्क्यांवर वर आले आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ३९७ पर्यंत खाली आहे, तर राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या २८४० झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत दीड लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात कोरोना बळींच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. गेल्या चोवीस तासांत १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जून महिन्यात कोरोना बळीच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये १० रुग्णांचा आणि दक्षिण गोवा इस्पितळात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

११६२ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल ११६२ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२२ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत इस्पितळामधून ७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

केवळ १५.२२ टक्के नमुने पॉझिटिव्ह
राज्यात चोवीस तासांत नवे ४१८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या २७४५ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आले. त्यातील १५.२२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

खासगी इस्पितळांनी लपवले होते ६७ कोरोना बळी

राज्यातील खासगी इस्पितळ किंवा इतर ठिकाणी मृत झालेल्या काही कोरोना रुग्णांचा आरोग्य खात्याच्या दैनंदिन अहवालात समावेश करण्यात आला नव्हता. आरोग्य खात्याने उशिरा नोंद झालेल्या राज्यातील ६७ कोरोना बळींची सविस्तर माहिती गोळा केली आहे.

राज्यातील कोरोना बळींच्या यादीत ६७ रुग्णांच्या नावाचा समावेश करण्यासाठी सरकारकडून मान्यता घेण्यात आली आहे. ५ ऑगस्ट २०२० ते २२ मे २०२१ या काळात कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या ६७ नागरिकांचा कोरोना अहवालात समावेश करण्यात आला आहे. १० महिन्यांनंतर ही माहिती उघड झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची माहिती वेळीच सादर न करणार्‍या खासगी इस्पितळांवर आवश्यक कारवाई केली जात आहे, अशी माहिती आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली.