कोरोनाविरोधातील लढ्यात उद्या प्रकाशाची शक्ती दाखवूया ः मोदी

0
138

>>  पंतप्रधानांचे व्हिडिओ संदेशाद्वारे भारतीयांना आवाहन

कोरोना या जागतिक संकटाशी सामना करताना सामूहिक शक्ती दाखवूया. त्यासाठी भारतीयांनी मला आपली सर्वांची रविवार दि. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वा.नंतरची 9 मिनिटे द्यावीत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी पंतप्रधानांनी रविवार दि. 5 रोजी रात्री 9 वा. 9 मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून आपल्या गच्चीत किंवा घरात मेणबत्ती, पणत्या किंवा मोबाईलचा फ्लॅशलाईट लावून आपली सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहन जनतेला केले.
पंतप्रधान मोदी यांनी काल शुक्रवारी सकाळी 9 वाजता प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदेशाद्वारे भारतीयांना हे आवाहन केले. या संदेशात पंतप्रधान  म्हणाले की, रविवारी आपल्याला कोरोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून प्रकाशाची शक्ती दाखवून द्यायची आहे. यासाठी उद्या रविवारी 130 कोटी जनतेच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे. उद्या रात्री 9 वाजता  तुम्ही तुमच्या घरातील सर्व लाइट्स बंद करा. घराच्या दरवाजात किंवा गच्चीत येऊन मेणबत्ती, पणती किंवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा. हे 9 मिनिटे करा.
पंतप्रधानांनी यामागचे कारण स्पष्ट करताना, देशभर सर्व लोक जेव्हा एक एक दिवे उजळतील तेव्हा प्रकाशाच्या महाशक्तीची जाणीव होईल. यामुळे आम्ही एकाच उद्देशाने एक होऊन लढत आहोत अशी भावना मनात जागृत होईल. हे दिवे जाळताना आम्ही एकटे नाही आहोत याचा संकल्प करू या असे आवाहन केले.
पंतप्रधानांनी या संदेशात पुढे, कोरोनाविरुद्ध इतकी मोठी लढाई लढत असताना आम्हाला जनता जनार्दनाचे विराट रूप, त्यांची अपार शक्ती याचा सतत साक्षात्कार करत राहिले पाहिजे. 5 एप्रिलला रात्री 9 वाजता या 9 मिनिटांच्या काळात कोणीही बाहेर जाऊ नये. कोणीही एकत्र येऊ नये. असे आवर्जून सांगितले. 22 मार्च या दिवशी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर लोक संध्याकाळी 5 वाजता थाळी, घंटा इत्यादी वाजवण्यासाठी घरांच्या बाहेर येत गर्दीही केली होती. त्यामुळे पंतप्रधानांनी हे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी पुढे, कोरोना जागतिक साथीच्या आजाराच्या विरोधात देशव्यापी लॉकडाऊनचे 9 दिवस पूर्ण झाले आहेत. या दरम्यान जनतेने शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन दिले आहे. हा लॉकडाऊनचा काळ अत्यंत गरजेचा आहे. आम्ही सर्वांनी घरात जरूर राहायचे आहे. मात्र यांपैकी कुणीही एकटे नाही. 130 कोटी जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक व्यक्तीच्या सोबत असल्याचे शेवटी सांगितले.