कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरनी लाखोजणांचे प्राण वाचवले ः मोदी

0
44

कोरोना महामारीच्या काळात देशभरातील डॉक्टरांनी लाखो नागरिकांचे प्राण वाचवले. त्यासाठी डॉक्टरनी दिवस रात्र परिश्रम घेतले. डॉक्टर म्हणजेच परमेश्‍वराचे दुसरे रूप आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केले. ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने पंतप्रधान मोदी गुरुवारी देशातील डॉक्टरांना संबोधित करत होते. कोरोना संकटाच्या काळात रुग्णसेवा करताना देशातील अनेक डॉक्टरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या सर्व डॉक्टरांना मी आदरांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

केंद्र सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी दोन लाख कोटींहून अधिकची तरतूद करण्यात आल्याची माहिती यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली. सरकारने डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी गेल्या वर्षीच कायद्यात अनेक कठोर तरतुदी केल्या आहेत. यासह, आम्ही आमच्या कोविड योद्ध्यांसाठी एक विनामूल्य विमा संरक्षण योजना देखील घेऊन आलो असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात एक चांगली गोष्टीही बघायला मिळाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी योगाबद्दल जागरुकता निर्माण केली आहे. योगाचा प्रचार आणि प्रसार हा स्वातंत्र्यानंतर गेल्या शतकात करायला हवा होता. पण तो आता होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी डॉक्टरांना अभ्यासाद्वारे योगास जागतिक व्यासपीठावर नेण्याचे आवाहन केले.