कोरोनाविरुद्धच्या लढाईत देश बनला आत्मनिर्भर

0
108

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; सीएसआयआरच्या बैठकीत देशातील वैज्ञानिक आणि संशोधकांचे कौतुक

देशातल्या वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामगिरीमुळे देश प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. आज आपल्या देशाचे वैज्ञानिक इतर देशांच्या वैज्ञानिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आपल्या वैज्ञानिकांनी एका वर्षात ‘मेड इन इंडिया’ कोरोना प्रतिबंधक लस बनवली. वर्षभरात कोरोना प्रतिबंधक लस तयार करून देश आत्मनिर्भर बनल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे (सीएसआयआर)च्या काल झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मोदींशिवाय या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन सहभागी झाले होते. तसेच प्रतिष्ठित वैज्ञानिक, संशोधक, उद्योगपती आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी वैज्ञानिक आणि संशोधकांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.

कोरोना हे शतकातील सर्वात मोठे आव्हान
कोरोना महामारी हे जगासमोर या शतकातील सर्वात मोठे आव्हान बनले आहे; पण इतिहास साक्षीदार आहे की, जेव्हा मनुष्यजातीवर मोठे संकट आले, तेव्हा विज्ञानाने उत्तम भविष्याचे मार्ग खुले केले आहेत. भारताने वर्षभरातच कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आणि जगाला दिली. हे वैज्ञानिकांच्या परिश्रमाचे फळ आहे. सीएसआयआरने आता समाजाशी संवाद साधून, त्यांच्या सल्ल्यांचा विचार करून काम करायला सुरुवात केली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

संशोधन सोप्या भाषेत उपलब्ध व्हावे
सीएसआयआरबद्दल लोकांना माहिती मिळायला हवी. आपल्या देशातले वैज्ञानिक, संशोधक कशा संदर्भात काम करत आहेत, हे त्यांना सोप्या भाषेमध्ये कळायला हवे. त्यामुळे तशी माहिती उपलब्ध करून देण्याचा सल्ला मी देत आहे, असेही मोदींनी नमूद केले.

सर्व क्षेत्रात भारत सशक्त व्हावा
आज भारत शेतीपासून ते अवकाश संशोधनापर्यंत, शस्त्रसज्जतेपासून ते कोरोना लसीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर आणि सशक्त बनू इच्छित आहे. भविष्यात आणखीनही संकट येऊ शकतात. त्याच्या तयारीची सुरुवात आतापासून करायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

खूप कमी वेळात कोरोनाचे कीट तयार केले
कोरोनाच्या सर्वात मोठ्या संकटात एका वर्षात लस आणि कीट तयार केली. खूप कमी वेळात संशोधन केले. दीड वर्षात शास्त्रज्ञांनी खूप मोठी कामगिरी केली. कोरोना काळात अभूतपूर्व योगदान शास्त्रज्ञांनी दिले, असे म्हणत नरेंद्र मोदींनी सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक केले.

आत्मनिर्भर भारत हाच संकल्प : पंतप्रधान
आपला देश आता सगळ्याच क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. आता आपल्याला योग्य नियोजन करून आणि निश्चित दिशेने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोरोनामुळे सध्या आपल्या प्रगतीचा वेग मंदावला असला, तरीही आत्मनिर्भर भारत हाच आपला संकल्प आहे. वैज्ञानिकांनी कोरोना काळात ज्या प्रमाणे परिश्रम करून आत्मनिर्भर होण्याची भूमिका घेतली, तशीच भूमिका आपल्याला प्रत्येक क्षेत्रात घ्यायची आहे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.