कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

0
12

>> राज्यात चोवीस तासांत ११२ बाधित, सक्रिय रुग्णसंख्या ९२८

राज्यात बारा दिवसानंतर आणखी २ कोरोना बळींची नोंद काल रविवारी झाली. त्याचबरोबर गेल्या चोवीस तासांत राज्यात नवीन ११२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एका कोरोनाबाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आला आहे. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या ९२८ एवढी झाली असून कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ११.७८ टक्के एवढे आहे.

राज्यात पंच्चाहत्तर दिवसानंतर गेल्या १३ जून २०२२ रोजी एका कोरोना बळीची नोंद झाली होती. आता, काल आणखी दोन बळींची नोंद झाली आहे.

जून महिन्यात आत्तापर्यंत ३ कोरोना बळींची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३८३५ एवढी झाली आहे. राज्यात जून महिन्यात कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होत आहे. सलग तीन दिवस दीडशेच्या आसपास कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर दोन दिवस शंभरच्यावर कोरोनाबाधित आढळून येत आहेत.
गेल्या चोवीस तासांत नवीन ९५० जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यातील ११२ नमुने बाधित आढळून आले आहेत.

७८ जण कोरोनामुक्त
राज्यात चोवीस तासांत आणखी ७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के एवढे आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसर्‍या बाजूने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.

दोघांनाही इतर गंभीर आजार

रविवारी कोविडमुळे ज्या दोघा रुग्णांचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला ते दोघेही रुग्ण हे वयाची सत्तरी पार केलेले रुग्ण होते व दोघांनाही गंभीर स्वरूपाचा आजार होता. दोघांनाही अत्यंत गंभीर असा जंतू संसर्ग झालेला होता.
या दोन रुग्णांपैकी एका रुग्णाचा एक पायही कापण्यात आला होता. दुसर्‍या रुग्णाच्या पायालाही गंभीर स्वरूपाची इजा व जंतू संसर्ग झालेला होता. त्यातच त्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कोविडमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे साथींच्या रोगांचे तज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडेकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले.

देशपातळीवर बाधितांत घट

देशातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत गेल्या चोवीस तासांत मोठी घट दिसून आली. गेल्या २४ तासांत देशात ११ हजार ७३९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात सध्या ९२ हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. शनिवारी दिवसभरात १० हजार ९१७ रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची सध्या ९२ हजार ५७६ इतकी आहे.