कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक लॉकडाऊन लावणार

0
99

>> केंद्र सरकारचा राज्यांना इशारा

ज्या भागात कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन होईल, त्या ठिकाणी कडक लॉकडाऊन सुरू करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना देशातील अनेक राज्यांत सध्या निर्बंध शिथिल होत आहेत. मात्र यामुळे अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने वरील इशारा दिला आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अनेक पर्यटक घराबाहेर पडत आहेत. पर्यटनस्थळी जाऊन ते गर्दी करत आहेत. या ठिकाणी कोणत्याही कोरोना नियमावलीचे पालन त्यांच्याकडून केले जात नसल्याचेही दिसून येत आहे. पर्यटकांकडून मास्क वापरले जात नाहीत. तसेच सामाजिक अंतराचेही पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. काही राज्यांमध्ये बाजारपेठा, दुकाने आणि मॉल्समध्ये ग्राहकांची झुंबड उडत आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

ईशान्येकडील राज्यांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता पर्यटनासाठी राज्यांच्या सीमा खुल्या झाल्यामुळे पर्यटकांची झुंबड उडाली आहे. राज्यांना व्यवहार पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र कोरोनाबाबतच्या निकषांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी न घेतल्यास तिथे पुन्हा लॉकडाऊन केले जाईल, असा इशारा केंद्राने दिला आहे.