कोरोनाबाधितांत चोवीस तासांत वाढ

0
48

>> राज्यात ४ मृत्यू, २५७ बाधित

राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू घटत असतानाच काल मंगळवारी २५७ बाधित सापडले. गेल्या चोवीस तासांत राज्यात स्वॅबच्या ५५३० चाचण्या करण्यात आल्या. त्यात २५७ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. तसेच कोरोनामुळे काल ४ जणांचा मृत्यू झाला. राज्यात ह्या महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ३०७९ एवढी झाली आहे. तर सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या १९५७ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,६७,८२३ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०० टक्क्यांवर पोहोचले आहे.

चार जणांचा मृत्यू
गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे राज्यात चार जणांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यांमध्ये साल्वादोर द मुंद पंचायतीतील ६६ वर्षीय महिला, करासवाडा येथील ६१ वर्षीय महिला, केरी साखळीतील ७७ वर्षीय पुरुष व विर्डी येथील ३८ वर्षीय तरुण यांचा समावेश आहे. या चौघांचाही गोवा वैद्यकीय इस्पितळात मृत्यू झाला.

सर्वाधिक रुग्ण कुठ्ठाळीत
सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण कुठ्ठाळी येथे असून त्यांची संख्या ११२ एवढी आहे. त्या खालोखाल फोंडा येथे १०३, शिवोली १०० एवढे रुग्ण आहेत. मडगाव येथे ९५, वास्को ९१, धारबांदोडा ८०, सांगे ७९, चिंबल ७६, पर्वरी ७३, पणजी ७१, कुडचडे ७१, केपे ६९, कासावली ६९, साखळी ६६, डिचोली ६४, खोर्ली ५५, काणकोण ५५, शिरोडा ५२, पेडणे ५१ असे रुग्ण आहेत.

आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,१९० एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,१६,१५५ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत ९,४७,९६३ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.

चोवीस तासांत २३० कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत राज्यात २३० जण बरे झाले आहेत. तर इस्पितळांतून काल १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६२,७८७ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात ११ जणांना भरती करण्यात आले.
काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने २४६ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.