कोरोनाने ८ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह

0
82

>> मृतांत ८ महिन्यांच्या बालिकेचा समावेश

राज्यात चोवीस तासात नवे ५१९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्यामध्ये एका ८ महिन्यांच्या बालिकेचा समावेश आहे. राज्यातील कोरोना बळीची संख्या ४६८ एवढी झाली आहे,

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार २३८ झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ४७२० एवढी झाली आहे. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेतील स्वॅबच्या नमुन्यांच्या तपासणीची संख्या वाढल्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन दिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होते. चोवीस तासांत १८९८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

आठजणांचा बळी
राज्यात कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाला. तर, मडगाव येथील कोविड इस्पितळात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शिरवई केपे येथील आठ महिन्यांच्या बालिकेला ३ ऑक्टोबरला पहाटे इस्पितळात दाखल करण्यात आला होते. इस्पितळात उपचार सुरू असताना बालिकेचा केवळ १६ तासांत मृत्यू झाला. सांतइस्तेव येथील ४८ वर्षांच्या पुरुषाचे, मोरजी पेडणे येथील ५० वर्षांच्या पुरुषाचे, कुर्टी फोंडा येथे ५२ वर्षांच्या पुरुषाचे, खोर्जुवे येथील ४६ वर्षांच्या महिलचे, मुरगाव येथील ५८वर्षांच्या पुरुषाचे, नागवा येथील ७५ वर्षांच्या महिला रुग्णाचे, वास्को येथील ६१ वर्षांच्या पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

५९४ रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात चोवीस तासांत ५९४ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ०५० एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६५ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी ३०५ रुग्णांनी होम आयझोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ८९ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

पणजीत नवे २९ रुग्ण
पणजीत नवे २९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. पणजीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २१३ एवढी झाली आहे. सांतइनेज, रायबंदर, दोनापावल, आल्तिनो, मिरामार, तांबडीमाती, करंजाळे, बॉक द व्हॉक, भाटले, पणजी शहर भाग, टोक आदी परिसरात नवे रुग्ण आढळून आले आहेत.

उत्तर गोव्यात पर्वरी येथे सर्वाधिक २७५ रुग्ण आहेत. साखळी येथे २४७, म्हापसा २१९, पणजी २१३, शिवोली २१८, चिंबल १९३, खोर्ली १९०, कांदोळी १७०, डिचोली १४७, पेडणे १६४, वाळपई १५५, हळदोणा १२० रुग्ण आहेत.

सर्वाधिक रुग्ण मडगावात
राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मडगाव परिसरात ३७८ एवढे आहेत. वास्को येथे २४६ रुग्ण, फोंडा येथे २६३ रुग्ण, काणकोण येथे १६५ रुग्ण, कुठ्ठाळी येथे १४६ रुग्ण, कुडचडे येथे १२७ रुग्ण, सांगे येथे १०२ रुग्ण आहेत.