कोरोनाने ४ बळी, १४८ बाधित

0
98

राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावात चढउतार दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनामुळे चार मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात एकूण ४६७८ स्वॅबच्या चाचण्या केल्या असता त्यात १४८ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ३१४० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ११३० एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७०,७२९ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५० टक्क्यांवर पोहोचले आहे.

चोवीस तासांत १५१ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत राज्यात १५१ जण बरे झाले आहेत. तर इस्पितळांतून काल १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६६,४५९ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात १६ जणांना भरती करण्यात आले. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १३५ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.

सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मडगाव येथे असून त्यांची संख्या ८९ आहे. पणजी ६४, फोंडा ६०, कुठ्ठाळी ५८, कासावली ५७, पेडणे ५५ अशी इतरत्र रुग्णसंख्या असून इतरठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.
आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,५७० एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,१८,६८२ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत १०,३९,००२ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.