कोमुनिदादीतील गाड्यांचे पुनर्वसन, भूखंडप्रश्‍नी विधानसभेत गदारोळ

0
120

सेरूला कोमुनिदादीतील गाड्यांच्या पुनर्वसन प्रकल्प व भूखंडांचा विषय काल विधानसभेत बराच गाजला. त्यामुळे आमदार रोहन खंवटे व नगर नियोजनमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. हा घोटाळा असल्याचा आरोप खंवटे यांनी केला.कोमुनिदादीवरील तात्पुरत्या व्यवस्थापन समितीला निधी मंजूर करण्याचा अधिकार नसताना नगर नियोजनला पैसे कुणी दिले, असा प्रश्‍न खंवटे यांनी केला. कोमुनिदादीच्या व्यवहाराच्या सर्व फाईल्स गुन्हा अन्वेषण पोलिसांनी व न्यायालयाने घेतल्या आहेत. त्यामुळे सध्या तपशिलवार माहिती देणे शक्य नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर माहिती देणे शक्य होईल, असे मंत्री डिसोझा यांनी सांगितले. या गोंधळामुळे सेरूला कोमुनिदादीच्या सर्वसामान्य लोकांना भूखंड मंजूर करणे शक्य होत नाही. संपूर्ण कारभार ठप्प झाल्याचे खंवटे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले व मंत्र्यांकडे माहितीसाठी आग्रह धरला. उत्तरे मिळत नसल्याने खंवटे खवळले. सभागृहातील वातावरण तापले. सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी खंवटे यांना खाली बसण्याचा आदेश दिला. सरकारचे या विषयावर संगनमत असून या घोटाळ्यात सर्वच सामील असल्याचा आरोप खंवटे यांनी केला. चर्चा चालू असतानाच आमदार निलेश काब्राल यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे खंवटे व काब्राल यांच्यातही जुंपली. बेकायदेशीरपणे गाड्यांचे पुनर्वसन केल्याचा खंवटे यांचा आरोप होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सभागृह समिती स्थापन करण्याची मागणीही खंवटे यांनी केली.