कोण देतो अपघातांना ‘निमंत्रण’?

0
192
  • श्री. अरुण देसाई

प्रत्येकाने ‘रस्ता उपयोगासंबंधीची आपली वृत्ती (ऍटिट्यूड)’ बदलली तर नक्कीच अपेक्षित असा बदल आपल्याला दिसून येईल. ‘वाहन चालक’ व ‘पादचारी’ यांनी रस्ता हा सर्वांचा/सर्वांसाठी आहे व प्रत्येकाचा त्यावर हक्क आहे हे लक्षात ठेवून त्याचा वापर केल्यास हे चित्र नक्कीच पालटेल अशी आशा बाळगू या..!!

रस्त्यावरील अपघात हे खरं तर ‘अपघाता’ने झाले पाहिजेत, पण आजकालची परिस्थिती पाहिल्यास अपघात हे नियमितपणे होत आहेत असं आपल्या लक्षात येईल.
रस्ता अपघाताची काही प्रमुख कारणं आहेत…
१. वाहन चालकाचे लक्ष विचलित होणे (डिस्ट्रॅक्टेड ड्रायव्हिंग)
२. नशेत गाडी चालवणे (ड्रंकर ड्रायव्हिंग)
३. भरधाव/अमर्याद वेग (ओव्हर स्पिडिंग)
४. निष्काळजीपणाने वाहन चालवणे (रेकलेस ड्रायव्हिंग)
५. रस्त्यावरील गुरं व अन्य अडथळे (ऍनिमल्स अँड अदर ऑब्स्ट्रक्शन्स ऑन रोड)
६. वाहनात अचानक होणारे बिघाड (सडन् डिफेक्ट्‌स इन व्हेइकल)

१) वाहनचालकाचे लक्ष विचलित होणे ः
आजकाल होणार्‍या बहुतांशी रस्ते अपघातांचं मुख्य कारण हे चालकाचं लक्ष विचलित होणं हेच आहे. उदा. गाडी चालवताना मोबाइल/सेल फोनवर बोलणे, मोबाइलवर टेक्स्ट मेसेज लाईक करणे, मोठ्या आवाजात गाणी लावणे, सतत इतर पॅसेंजरशी बोलणे, मोबाइलवरचे मेसेज वाचणे व काही वेळा तर चक्क मेकअप करणे इ. आजची तरुण पिढी ही सेल फोनच्या इतकी आहारी गेलीय की त्याशिवाय त्यांना क्षणभरही करमत नाही व त्यामुळेच गाडी चालवताना फोनवर बोलणे व फोन लावणे किंवा मेसेजेस पाठवणे यांसारखे उद्योग ही मंडळी करत असतात. नेमकी त्याचवेळी अशी एखादी गोष्ट घडते ज्याकडे या मंडळींना पूर्ण लक्ष देता येत नाही आणि अपघात घडतो. क्षणभरही लक्ष विचलीत झालं तरी अनर्थ घडू शकतो… इतकं लक्षात येण्याइतपत ही आपली आजची युवा पिढी परिपक्व नाही असंच समजायचं का?
२) नशेत गाडी चालवणे ः
दारू, गुटखा किंवा नशेच्या गोळ्या घेतल्यावर वाहन चालवणं हेसुद्धा एक मुख्य कारण आहे रस्ता अपघातांचं! नशेत असलेल्या व्यक्तीचा प्रतिसाद (रिसपॉन्स) व आकलन शक्ती कमी झालेली असते व नशेत असताना वाहन चालवणे हे अपघाताला निमंत्रणच देण्यासारखे आहे. काही वाहनचालकांना तर नशेत वाहन चालवण्याचीच ‘नशा’ चढलेली असते. त्यांचा जणू समजच झालेला असतो की मी नशेतच वाहन हाकू शकतो. कारण वर्षानुवर्षे तो बिनधास्तपणे हे करत आलेला असतो. शिवाय हल्ली हल्लीसुद्धा ‘तपासणी पथक’ नशेत वाहन चालवणार्‍यांची तपासणी करायला किंवा तसं चलन द्यायला कचरत असत. याचं मुख्य कारण म्हणजे अशा चलनांची पुढील किचकट न्याय प्रक्रिया! त्यामुळेच अशा वाहन चालकांचं फावलं. पण आता गोष्टी इतक्या वाईट थराला पोहचल्यात की एन्फोर्समेंट सिस्टिम (आर.टी.ओ. व पोलीस) यांना अशा गुन्ह्यांची दखल घ्यावीच लागली.
३) भरधाव/अमर्याद वेग (ओव्हर स्पिडिंग) ः
अमर्याद वेगाने वाहन हाकणे… हासुद्धा तरुण पिढीला लागलेला एक विशेष ‘रोग’ नव्हे ‘संसर्गजन्य रोग’ आहे असं म्हणावं लागेल. कारण हल्ली आपण गल्लोगल्ली चाललेली जीवघेणी स्पर्धा अनुभवतो. प्रत्येक वाहन हे एका विशिष्ट वेगमर्यादेतच चालवावं असा संकेत आहे. पण केवळ ‘आकर्षण’ किंवा ‘स्पर्धा’ म्हणून जेव्हा हा संकेत पाळला जात नाही- हेच नेमकं अपघाताला निमंत्रण असतं. एखादं वाहन विशिष्ट वेगात धावत असतं तेव्हा ते जर नियंत्रित करायचं झालं तर त्यासाठी विशिष्ट वेळ लागतोच व बहुतांशी अशा अमर्याद वेगानं धावणार्‍या वाहनाकडे किंवा चालकाकडे तेवढा वेळ नसतो व अपघात घडतात. सध्याची ‘स्पर्धात्मक वृत्ती’ हेही अशा अमर्याद वाहन हाकण्याचं एक मुख्य कारण असावं असं वाटतं. खूप वेळा कुठेतरी ‘रस्ता जाम’मध्ये वाया गेलेला वेळ भरून काढायचा म्हणूनही काही चालक वाहन भरधाव पळवतात आणि नको ते घडतं.
४) निष्काळजीपणाने वाहन चालविणे ः
वाहन चालवण्याचे काही नियम आहेत व प्रत्येक चालकाने त्या नियमांचं पालन करणं रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचंच नव्हे तर अनिवार्य आहे. पण दुर्दैव असं आहे की खूपच कमी चालक आजकाल नियम पाळताना दिसतात. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण ‘सिग्नल्स’चं देऊ शकतो. प्रत्येक सिग्नलवर ६० किंवा ९० सेकंदांनी सिग्नल बदलतो म्हणजेच ‘लाल’ असलेला दिवा ‘हिरवा’ होतो पण शेवटच्या ५-६ सेकंदात चालक इतका उतावीळ झालेला असतो की सिग्नल लाईन क्रॉस करून तो मध्ये पोहचलेला असतो. आणि बरेच अपघात हे अशा उतावळ्या चालकांमुळे घडतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल प्रत्येक गाडीला मग ती दुचाकी का असेना त्याला ‘‘ट्रॅफिकेटर सिग्नल्स’’ असतात. पण क्वचितच चालक आपण कोणत्या दिशेनं वळणार आहोत हे दाखवण्यासाठी अशा ट्रॅफिकेटर्सचा वापर करताना आढळतात.
५) रस्त्यावरील गुरे व अन्य अडथळे ः
मोकाट सुटलेली गुरे व रस्त्याच्या किंवा इतर कामासाठी रस्त्याचं खोदकाम हेसुद्धा अपघाताला निमंत्रण देतात. हल्ली गावा-गावातच नव्हे तर काही शहरांमध्येसुद्धा हा गुरांचा उपद्रव.. विशेष करून रात्रीच्या वेळी… वाहन चालकाची जणू परीक्षा घेत असतो. इतर अडथळे जे बहुदा रस्त्यावर काही काम चालू असलं की निर्माण करतात… ते खूप वेळा तसेच पडून असतात व जरी अडथळे काढले तरी रस्त्यावरील खणलेले चर किंवा न बुजवलेले खड्डे हे हमखास अपघाताना निमंत्रण देतात.
६) वाहनात अचानक होणारे बिघाड ः
वाहन हे एक यंत्र आहे व त्यात कधीही बिघाड होऊ शकतो. आपण जर सर्व नियम पाळून गाडी चालवत असलो तरी वाहनात झालेला बिघाड हेही काही वेळा अपघाताचं कारण ठरू शकतं. उदाहरणच द्यायचं झाल्यास ‘वाहनाचं वाढणारं तापमान’ किंवा अचानक ‘टायर फुटणे’. बहुतांशी अशा अपघातांना चालक जबाबदार नसतो पण वेळोवेळी वाहनाची देखभाल किंवा आवश्यक अशा चाचण्यांकडे केलेलं दुर्लक्ष. उदा. गाडीमध्ये ‘कूलेंट’ व टायरमध्ये व्यवस्थित मात्रेत ‘हवा’ जर आपण दुर्लक्षित केली तर अशा अपघाताना ते निमंत्रण देण्यासारखंच आहे.

उपाय….
* सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे ‘अपघात’ हे अपघातानं होणं अनिवार्य आहे पण ते जेव्हा, नियमितपणे होतात तेव्हा त्याचं मुख्य कारण हे ‘मानवी चूक’ (ह्यूमन एरर) हेच असतं. म्हणून अशा चूका टाळणं हाच अपघात टाळण्याचा एक उपाय आहे.
* वाहनाची नियमित तपासणी जेणेकरून वाहनात तांत्रिक बिघाड शक्यतो होणार नाहीत. प्रामुख्याने टायरमधील हवा व कूलेंट या गोष्टी आवर्जून तपासाव्यात. त्याचप्रमाणे टायर्सची झीज किंवा ब्रेक/क्लचेसची ऑपरेशन्स म्हणजे ती व्यवस्थितपणे काम करत आहेत की नाही हेसुद्धा वेळोवेळी तपासणं अत्यंत आवश्यक आहे.
* वाहनासाठी ठरवलेली किंवा विशिष्ट रस्त्यावरील वेगमर्यादा पाळणं व लेन पद्धतीच्या नियमानुसार गाडी/वाहन चालवणं हेसुद्धा रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे.
* वाहन चालवताना आपलं लक्ष विचलीत होईल अशी कोणतीही गोष्ट टाळणं हा तर ‘‘सर्वोत्तम’’ उपाय. उदा. मोबाइल संभाषण, मेसेजिंग, वाचन व सततचे बोलणे किंवा रस्त्यावरचं आपलं लक्ष इतरत्र वळवणं जर चालकानं टाळलं तर अपघात नक्की टळतील.
* वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन – वाहतूक नियम हे सर्वथा वाहन चालक व त्या वाहनातून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असतात. पण वाहन चालक हे सर्व नियम केवळ ‘वाहतूक पोलीस’ किंवा आर.टी.ओ.साठी म्हणूनच पाळतात. उदा. हेल्मेटचा वापर हा केवळ आर.टी.ओ. किंवा पोलीस चेकिंग असलं तरच करणारी मंडळी आपण दररोज बघत असतो. वास्तविक जर चालकानं हेल्मेट घातलं तर त्याचं ‘डोकं’ सुरक्षित राहतं व जर अपघात झाला तर होणारी इजा कमी होते. तसंच सीट बेल्टचं. आता तरी काही वाहनांमध्ये सीट-बेल्ट बांधला नाही तर सेफ्टी बॅग्ज उघडत नाहीत हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे.

* नशेत असताना किंवा आदल्या दिवशी झोप व्यवस्थित झाली नसल्यासही वाहन चालवणं टाळावं जेणेकरून अपघात होणार नाही. नशेत असताना आपल्या आकलन शक्तीमध्ये होणारी घट व प्रतिसाद देण्याला लागणारा वेळ (रिस्पॉन्स टाईम) हा अपघाताला कारणीभूत होऊ शकतो.

* ‘रस्ता सुरक्षा’ हा विषय शैक्षणिक पद्धतीत समाविष्ट करून तो ३ री पासून ११ वीपर्यंत शिकवावा जेणेकरून एक रस्ता-सुरक्षा-संस्कृती मुलांमध्ये रुजेल.. रुळेल. ‘‘कॅच देम यंग’’ या उक्तीनुसार बर्‍याच अंशी रस्ता सुरक्षेत सुधारणा होईल.
सरते शेवटी एकमेव ‘उपाय’ जर कोणता असेल तर तो म्हणजे प्रत्येकाने ‘रस्ता उपयोगासंबंधीची आपली वृत्ती (ऍटिट्यूड)’ बदलली तर नक्कीच अपेक्षित असा बदल आपल्याला दिसून येईल. ‘‘वाहन चालक’’ व ‘‘पादचारी’’ यांनी रस्ता हा सर्वांचा/सर्वांसाठी आहे व प्रत्येकाचा त्यावर हक्क आहे हे लक्षात ठेवून त्याचा वापर केल्यास हे चित्र नक्कीच पालटेल अशी आशा बाळगू या..!!