कॉंग्रेस महिलांसोबत गोव्याचेही रक्षण करेल

0
27

>> मडगावातील महिला मेळाव्यात प्रियांका गांधींचे आश्‍वासन

भारतातील महिला सक्षम असून त्यांचे भारतीय स्वातंत्र्य तसेच गोव्याच्या मुक्तीसाठी त्यांनी त्याग केला आहे. परंतु भाजप सरकारची विचारधारा महिला विरोधी आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी स्वातंत्र्य देण्यात येत नाही. महिला निर्भरही नाही आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. हे मिळविण्यासाठी लढले पाहिजे.

गोव्याच्या उज्वल भवितव्यासाठी येथील संस्कृती पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कॉंग्रेसला मत द्या. जो पक्ष महिलांसोबतच गोव्याचे रक्षण करेल त्या पक्षाला मत द्या. कॉंग्रेसच्या पाठिशी खंबीरपणे रहा असे आवाहन कॉंग्रेसच्या अखिल भारतीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मडगाव येथील कॉश्ता मैदानावर कॉंग्रेसच्या प्रियदर्शनी महिला मेळाव्यात बोलताना केले.

व्यासपीठावर गोवा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा बीना नायक, खानापूरच्या आमदार डॉ. अंजनी निंबाळकर, अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या सीमा फर्नांडिस, डॉ. प्रमोद साळगावकर, स्वातंत्र्यसेनानी शशिकांत होडारकर, माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन, पी. चिंदबरम्, दिनेश गुंडू राव, माजी मंत्री आलेक्स सिकैरा, आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स उपस्थित होते.

उद्योगपतींच्या फायद्यासाठी
रेल्वे महामार्गाचे दुपदरीकरण

रेल्वेचे दुपदरीकरण हे एक दोन उद्योेगपतींच्या फायद्यासाठी होत असून गोव्याला फक्त प्रदूषण मिळणार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे या प्रकल्पांविरोधात जनता असून जनतेला कॉंग्रेसचा पूर्ण पाठिबा असल्याचे प्रियांका यांनी यावेळी सांगितले.

कॉंग्रेसचे निर्णय जनतेच्या हिताचे

>> चिखलीतील सभेत प्रियांका गांधींचे प्रतिपादन

कॉंग्रेस पक्ष हा लोकांचा आवाज ओळखतो. कॉंग्रेस पक्ष जो निर्णय घेतो तो लोकांच्या हिताचा असतो. आपल्याला आता येणारी विधानसभा निवडणूक जिंकायची आहे असे प्रतिपादन कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी चिखली दाबोळी येथे कॉंग्रेस कार्यकर्ते मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस दिनेश गुंडुराव, केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, कॉंग्रेसचे नेते दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, आलेक्स रेजिनाल्ड, फ्रान्सिस्को न्युनीस व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना गांधी यांनी, गोव्यात बदल घडवायचा असेल, विकास घडवून आणायचा असेल तर जनतेची कामे आणि विकासाच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या पक्षालाच मत द्या असे आवाहन केले.

यावेळी दिगंबर कामत यांनी, कॉंग्रेस पक्ष महत्त्वाचे निर्णय घेतो. आम्हाला बंगाली तसेच दिल्लीचा पक्ष नको. सध्याचे सरकार लोकांचा आवाज दाबून टाकत आहे. त्यांना यापुढे राज्य करण्याचा कोणताच हक्क नाही. येणारे सरकार हे कॉंग्रेसचेच असेल असा विश्‍वास व्यक्त केला.