कॉंग्रेस तृणमूल युतीबाबत चर्चेसाठी राहुल गांधी आज घेणार महत्वाची बैठक

0
14

गोवा विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून, गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसकडून युतीबाबत मोघम वक्तव्ये केली जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे मंगळवारी नवी दिल्ली येथे गोव्यातील कॉंग्रेस नेत्यांसोबत बैठक घेऊन दोन्ही पक्षांतील युतीविषयी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड या पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे, यासाठी या पक्षांच्या नेत्यांकडून युतीबाबत काही दिवसांपासून मोघम विधाने केली जात आहेत. मात्र अधिकृतपणे कोणताच प्रस्ताव समोर आलेला नाही. सध्या कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड, तर तृणमूल कॉंग्रेस व मगो यांच्यात युती झाली आहे.

सोमवारी दिल्लीत राहुल गांधी यांनी गोवा विधानसभा निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम आणि वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत बैठक घेऊन ५ राज्यांतील विधानसभा निवडणूक रणनीतीविषयी चर्चा केली. त्यानंतर आता राहुल गांधींनी कॉंग्रेस-तृणमूल युतीबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी गोव्यातील कॉंग्रेस नेत्यांना पाचारण केले आहे.