कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीसाठी प्रयत्न

0
14

>> दोन्ही पक्षांत उद्या होणार पाटो पणजी येथे बैठक

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना चर्चेसाठी बोलावले आहे. ही बैठक उद्या शनिवार दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पाटो पणजी येथील कॉंग्रेस पक्षाच्या निवडणूक कार्यालयात होणार आहे. या बैठकीला गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर व इतर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी एका संदेशाद्वारे काल दिली.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी नवी दिल्ली येथे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याची तयारी सरदेसाई यांनी दर्शविली होती. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड यांची संयुक्त बैठक बोलाविल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोवा फॉरवर्डची बैठक
गोवा फॉरवर्डच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच, कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव यांनी ११ डिसेंबर रोजी आयोजित बैठकीच्या निमंत्रणावर चर्चा झाली. युतीच्या विषयावर बैठकीत निर्णय झालेला नाही. आज शुक्रवारी पुन्हा बैठक घेतली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, कॉंग्रेस पक्षाने गोवा फॉरवर्ड या स्थानिक पक्षाशी निवडणूक युती अजूनपर्यंत केलेली नसली तरी त्यांच्याशी युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे कॉंग्रेसचे गोवा निवडणूक प्रमुख तथा ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी नवी दिल्ली येथे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन भाजपच्या पराभवासाठी कॉंग्रेसला त्यांनी पाठिंबा दिला असल्याचे पी. चिदंबरम यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

कॉंग्रेस उमेदवारांची पहिली
यादी लवकरच ः चिदंबरम

गोवा विधानसभेच्या आगामी २०२२ मध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. कॉंग्रेस पक्षाच्या ३५ ते ३६ गट समित्यांनी संभाव्य उमेदवारांची नावे निश्‍चित करून पाठविली आहेत. निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांची घोषणा केंद्रीय पातळीवर केली जाणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसच्या गट समित्यांनी पाठविलेल्या संभाव्य उमेदवारांच्या नावावर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा करून उमेदवार निश्‍चित केले जाणार आहेत. काही मोजक्याच गट समित्यांकडून उमेदवारीसाठी एकमेव नावाची शिफारस केल्याचे चिदंबरम म्हणाले.

भाजपमध्ये प्रवेशाचा
रेजिनाल्डकडून इन्कार

काल प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दक्षिण गोव्यातील एक मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. त्यासंबंधी बोलताना कुडतरीचे कॉंग्रेस आमदार ऍलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना मी माझ्या रक्ताने लिहून द्यायला तयार आहे की मी भाजप प्रवेश करणार नाही असे ठामपणे सांगितले. जी माणसे जात नाहीत त्यांच्याविषयी अफवा पसरविण्याचे काम भाजप करीत असते.

मात्र कुणी खरोखरच त्यांच्याशी हात मिळवणी करतो तेव्हा ते गुपचूपपणे त्याला आत घेतात. लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे सगळे केले जात आहे. पण लोक अशा अफवांवर आता विश्वास ठेवणार नसल्याचे मडगावचे आमदार दिगंबर कामत हे भाजपमध्ये प्रवेश करतील असेही आपणाला वाटत नसल्याचे ते म्हणाले.