कॉंग्रेसतर्फे महागाईविरोधात जनजागृती आंदोलन सुरू

0
22

महागाई आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने चालवलेल्या गैरव्यवस्थानाचा निषेध करण्यासाठी देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या वतीने काल गुरूवारी गोव्यातील सहा मतदारसंघात महागाईविरोधात कॉंग्रेसने जागृती अभियान सुरू केले. यावेळी नागरिकांच्या भेटी घेऊन महागाई आणि त्यामुळे वाढलेली बेरोजगारी व गरिबीबद्दल माहिती देण्यात आली.

या अभियानात गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष धर्मा चोडणकर, विश्वनाथ हळर्णकर, रुडॉल्फ फर्नांडिस, व्हिक्टर गोन्साल्विस, शायनी ऑलिव्हेरा, जिल्हा पंचायत सदस्य आणि सांत आंद्रे गटमध्ये मोहन धोंड, टोनी फर्नांडिस, सावियो मोंतेरो, अँथनी अल्फान्सो, देवसुरभी यदुवंशी यांच्यासह विविध स्थानिक नेतेही सामील झाले.
यावेळी पणजीचे नेतृत्व माजी मंत्री संगीता परब, शंकर किर्लपालकर, उदय मडकईकर, सुरेंद्र फुर्तादो, मेनिनो डिक्रूझ, जोएल आंद्रादे यांनी केले. एल्विस गोम्स यांनी मडकई येथे आंदोलनाचे नेतृत्व केले. मांद्रे आणि शिवोली गटच्या स्थानिक नेत्यांनी जागृती आंदोलन केले.

पणजीतील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील आझाद मैदानावरून महागाईच्या विरोधात पत्रके वाटली. महानगरपालिका मार्केटमध्ये महागाईच्या विरोधात जनजागृती केली.

यावेळी बोलताना श्री. चोडणकर यांनी, लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लोक भाजपच्या ‘अच्छे दिन’विरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. येत्या ७ दिवसांत हा कार्यक्रम सर्व ४० मतदारसंघात सुरू राहणार असल्याची माहिती दिली.
कॉंग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम आज शुक्रवारी या मोहिमेत सामील होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी दिली.