कॉंग्रेसच्या फुटलेल्या दहा आमदारांमुळे सरकारला स्थैर्य

0
35

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे जुवारीनगर येथे प्रतिपादन

कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये आलेल्या १० आमदारांमुळे राज्यातील भाजप सरकारला स्थैर्य प्राप्त झाले. त्यामुळे कॉंग्रेस पक्षातून फुटून आलेले ते दहाही आमदार अभिनंदनास पात्र आहेत, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे म्हणाले. काल जुवारीनगर येथे ‘सरकार तुमच्या दारी’ ह्या कार्यक्रमातून बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील उद्गार काढले.

कॉंग्रेसमधील १० आमदार फुटून भाजपमध्ये येण्यापूर्वी मगो नेते सुदिन ढवळीकर हे भाजप मंत्रिमंडळात होते. मात्र, त्यावेळी त्यांनी स्वार्थाचे राजकारण सुरू केल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आल्याचे सावंत म्हणाले.

या मोक्याच्या क्षणीच कॉंग्रेस पक्षातील १० आमदार फुटून आले व त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी कॉंग्रेस पक्षातून फुटून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच आपल्या नेतृत्वाखालील सरकारला स्थैर्य लाभू शकल्याचे सांगून त्यासाठी फुटून आलेले हे दहाही आमदार अभिनंदनास पात्र असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. ते जर फुटून आले नसते तर भाजप राज्यात स्थिर सरकार देऊ शकले नसते, असे सावंत पुढे म्हणाले.

सावंत सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असलेल्या सुदिन ढवळीकर यांना मार्च २०१९ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या मंत्रिमंडळतून डच्चू दिला होता.

सुदिन ढवळीकर हे जर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असते तर त्यांनी आपल्या सरकारला लोकांना मोफत पाणी देण्यासाठीची योजना सुरू करण्यास दिली नसती, असेही सावंत यावेळी म्हणाले.
ढवळीकर हे २० वर्षे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. पण त्यांनी राज्यातील लोकांना योग्य प्रकारे पाणीपुरवठा केला नाही, असा आरोपही सावंत यांनी केला.