कॉंग्रेसचे फेब्रुवारीत महाअधिवेशन; पक्ष कार्यकारिणी समिती निवडणार

0
14

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये २४ ते २६ फेब्रुवारी या काळात कॉंग्रेसचे ८५ वे महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनातच पक्षाचे सर्वोच्च धोरण ठरवणार्‍या कॉंग्रेस कार्यकारिणी समितीच्या निवडीचाही मार्ग मोकळा होणार आहे. पक्षासाठी निर्णय घेणारी ही सर्वोच्च समिती आहे.

नवी दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी याविषयी माहिती दिली. रायपूरमध्ये होणार्‍या तीन दिवसीय अधिवेशन काळात पक्ष घटनेशी संबंधित काही अनिवार्य दुरुस्त्याही केल्या जातील. अधिवेशन काळात खर्गे यांच्या अध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब करण्याबरोबरच कार्यकारिणीच्या स्थापनेचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.

कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवडीला मंजुरी देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या अधिवेशनात निवडणुकीद्वारे नवीन कार्यकारिणी स्थापन करायची की कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना सर्वानुमते नामनिर्देशित करण्याचे अधिकार दिले जातील, याबाबतचा निर्णय या अधिवेशनात होईल. पक्ष घटनेनुसार, कॉंग्रेस कार्यकारिणीच्या १२ सदस्यांची निवड करण्याची तरतूद आहे, तर १२ जणांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून नामनिर्देशित केले जाते. लोकसभा निवडणुकीला एक वर्षे उरले असताना कॉंग्रेस कार्यकारिणी समितीच्या निवडणुका पक्षात नेमका काय बदल घडवतात हे ही पाहणे महत्वाचे असेल.