कॉंग्रेसचे आमदार फुटणार ही निव्वळ अफवा ः कवळेकर

0
144

कॉंग्रेस पक्षातील आमदारांचा एक गट पक्षातून फुटून भाजप सरकारला पाठिंबा देणार असल्याचे वृत्त ही केवळ एक अफवा असल्याचे काल विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी एका पत्रकातून स्पष्ट केले आहे.

आपले सरकार हे व्हेंटिलेटरवर आहे याची भाजपला जाणीव आहे. तसेच आपले काही आमदार असंतुष्ट आहेत हेही त्यांना माहीत आहे. या पार्श्‍वभूमीवर आपले सरकार वाचवण्यासाठी भाजपने रचलेला हा कट आहे असे कवळेकर यांनी आपल्या पत्रकातून नमूद केले आहे.

आमदार दिगंबर कामत, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, सुभाष शिरोडकर व टोनी फर्नांडिस हे पक्षातून फुटून भाजपशी हातमिळवणी करणार असल्याचे वृत्त हे निराधार व खोटे आहे, असे कवळेकर यांनी पत्रकातून स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसचे सर्व आमदार हे पक्षाशी प्रामाणिक असून ते गद्दारी करणार नसल्याचा दावा कवळेकर यांनी पत्रकात केला आहे.

भाजपमध्ये जाणार असल्याचे
वृत्त पूर्णपणे खोटे ः दिगंबर
भाजपमध्ये आपण प्रवेश करीत आहे हे वृत्त पूर्णपणे खोटे व निराधार आहे. मुद्दाम कोण तरी पुन्हा पुन्हा तशी अफवा पसरवीत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काल मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. आपण आतापर्यंत ७ वेळा विधानसभेवर निवडून आलो आहे, असे सांगून आपणाविषयी पुन्हा पुन्हा अफवा पसरविण्यात येत आहेत. अशा प्रकारांमुळे आता खुलासा करण्यासही आपणाला कंटाळा येत असल्याचे कामत म्हणाले. भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे ते म्हणाले.