कॉंग्रेसची ट्विटर खाती ब्लॉक करण्याच्या आदेशास स्थगिती

0
17

कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश

बंगळुरू येथील कनिष्ठ न्यायालयाने सोमवारी ‘कॉंग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो यात्रे’ची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा आदेश दिला होता. कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बंगळुरू न्यायालयाने हा आदेश जारी केला होता. ‘कॉंग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो यात्रे’ची ट्विटर खाती तात्पुरत्या स्वरुपात ब्लॉक करण्याचा आदेश दिला होता.

या आदेशानंतर, दुसर्‍याच दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशाला काल स्थगिती दिली. मात्र कॉंग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरून संबंधित सर्व कॉपीराइटचे उल्लंघन केलेली सामग्री काढून टाकावी, असा आदेश दिला असून, त्यासाठी बुधवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

‘एमआरटी म्युझिक’ कंपनीने कॉंग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात यशवंतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कॉंग्रेसने ‘केजीएफ-२’ या चित्रपटातील संगीत बेकायदेशीरपणे वापरल्याचा (कॉपीराइट) आरोप कंपनीने केला होता.

एमआरटी कंपनीने न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर बंगळुरूतील कनिष्ठ न्यायालयाने कॉंग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचे आदेश ट्विटर कंपनीला दिले होते; पण काल कर्नाटक उच्च न्यायालयाने बंगळुरू न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली.