गोव्याचे सुपुत्र असलेल्या के. वैकुंठ यांनी एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत छायाचित्रकार म्हणून केलेले का’ हे फार मोठे आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यंदा इफ्फीमधून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. टपाल खात्याने या महान अशा कलाकाराचा गौरव म्हणून त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे जे टपाल तिकीट काढले आहे त्याचे अनावरण करताना आपणाला आनंद होत असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी
सांगितले.
गोमंतकीय सुुपुत्र व हिंदी चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे दिग्गज असलेल्या के. वैकुंठ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना श्रद्धांजली म्हणून काल इफ्फीत त्यांचा ‘गोवा मार्चीस ऑन’ हा माहितीपट दाखवण्यात आला. के. वैकुंठ यांनी दिग्दर्शित केलेल्या त्यांच्या या 17 मिनिटांच्या माहितीपटातून त्यांनी गोवा मुक्तीनंतर गोव्याने केलेल्या विकासाचा आढावा घेतलेला आहे. या माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर टपाल खात्याने के. वैकुंठ यांच्या के. वैकुंठ यांच्या टपाल तिकिटाचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
के. वैकुंठ यांनी कलाकार म्हणून केलेल्या कार्याची आठवण सदैव ठेवली जाईल असे सांगून त्यांचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
आयनॉक्समधील थिएटर 3 मध्ये झालेल्या या सोहळ्याला टपाल खात्याच्या महाराष्ट्र व गोवा विभागाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह हेही हजर होते. यावेळी बोलताना श्री. सिंह यांनी, आघाडीचे सिने छायाचित्रकार के. वैकुंठ यांच्या टपाल तिकिटाचे आज अनावरण होत आहे याचा आपणाला आनंद आहे. के. वैकुंठ यांनी केलेले काम हे फार मोठे आहे, अशा शब्दांत गौरव केला. आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊनच सरकारने त्यांना इफ्फीतून विशेष अशी श्रद्धांजली वाहिली असल्याचे ते म्हणाले. भारतातील दिग्गज अशा व्यक्तींची टपाल तिकिटे काढून टपाल खात्याने त्यांचा गौरव करण्याची परंपरा चालूच ठेवली असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

