केशकर्तनालये, मैदाने सोमवारपासून खुली

0
101

>> दुकानांची वेळ वाढणार

>> राज्यातील संचारबंदीत १२ जुलैपर्यंत वाढ

गोवा सरकारने राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीत वाढ करण्याचा निर्णय घेताना काल ही संचारबंदी १२ जुलैपर्यंत वाढवली आहे. मात्र या संचारबंदीच्या काळात दुकाने खुली करण्याची वेळ वाढवून दिली असून केशकर्तनालये व क्रीडा मैदाने खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी ३ या ऐवजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत.

सरकारच्या नव्या आदेशानुसार संचारबंदी १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. नव्या आदेशानुसार क्रीडा मैदाने, केशकर्तनालये, स्टेडियम्स खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारने गेल्या २६ जून रोजी संचारबंदीत ५ जुलैपर्यंत वाढ केली होती. काल काढलेल्या नव्या आदेशानुसार ही संचारबंदी ७ दिवसांनी वाढवली आहे.

सरकारने मागे काढलेल्या आदेशानुसार दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यात आता नव्या आदेशानुसार वाढ करण्यात आली असून ही दुकाने दुपारी ३ ऐवजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे.
शेजारच्या महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लस ह्या कोरोनाच्या उत्परिवर्तीत व झपाट्याने संसर्ग होणार्‍या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोवा सरकारने राज्यातील प्रमुख सीमांवर खासगी प्रयोगशाळांद्वारे कोरोनासाठीची तपासणी केंद्रे सुरू केलेली आहेत. त्याशिवाय राज्यात लसीकरणावरही जोर देण्यात आलेला आहे.

मद्यालये व रेस्टॉरंट्‌स
खुली करण्याची मागणी
कोरोना महामारीमुळे गेल्या सुमारे वर्षभरापासून बंद असलेली मद्यालये व रेस्टॉरंट्‌स खुली करण्यास सरकारने मान्यता द्यावी, अशी मागणी अखिल गोवा बार आणि रेस्टॉरंट मालक संघटनेचे अध्यक्ष मायकल कारास्को यांनी केली आहे. गेले वर्षभर लॉकडाऊन आणि सध्या जारी असलेली संचारबंदी यामुळे राज्यातील बार आणि रेस्टॉरंट्‌सना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. या व्यवसायात ९० टक्के लोक हे गोमंतकीय आहेत. कोरोनामुळे त्यांचा हा उपजीविकेचा व्यवसाय बंद पडल्याने ते गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक जण आर्थिक समस्येमुळे आपले रेस्टॉरन्ट व मद्यालय विकण्याचाही विचार करत असल्याचे कारास्को यांनी सांगितले.

सरकारने अबकारी शुल्कात, परवाना शुल्कात आणि अबकारी दरातही वाढ केली आहे तसेच वातानुकुलीत व बिन वातानुकुलीत जागेसाठी वेगळे शुल्क आकारले जात असल्याचेही त्यांनी नजरेस आणून दिले आहे. गेल्या वर्षी सहा महिने व चालू वर्षी ३ महिन्यांपासून व्यवसाय बंद आहे. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे कारास्को यांनी म्हटले आहे.

मासळी मार्केट, मॉल्स, घाऊक विक्रीची दुकाने खुली करण्यात आली आहेत, आता मद्यालये व रेस्टॉरंट्‌सही खुली करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कारास्को यांनी केली आहे.

२ लाख रुपये सानुग्रह निधी
ज्या कुटुंबातील व्यक्तीचे कोविडमुळे निधन झाले आहे अशा कुटुंबांना २ लाख रुपये सानुग्रह निधी देण्यासाठीची योजना काल गोवा सरकारने अधिसूचित केली. ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वार्षिक ८ लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल त्याच कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच गेल्या १५ वर्षांपासून गोव्यात वास्तव्य असलेल्या कुटुंबाचाच या योजनेसाठी विचार केला जाणार आहे. या योजनेखाली एका कुटुंबाला फक्त एकच दावा करता येणार आहे. समाजकल्याण खात्याद्वारे या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.