केवळ तीन महिन्यांसाठी नियुक्ती केल्याने पॅरा शिक्षकांची नाराजी

0
115

राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या पॅरा शिक्षकांची यंदाच्या शैक्षणिक वर्षी १० महिन्यांऐवजी केवळ तीन महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आल्याने या शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी या शिक्षकांची १० महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात येत असते. मात्र, यंदा केवळ तीन महिन्यांसाठीच नियुक्ती करण्यात आल्याबद्दल या शिक्षकानी आश्‍चर्य व नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शिक्षण संचालक दिलीप भगत यांनी यासंबंधी खुलासा करताना या शिक्षकांची तीन महिन्यांसाठी नियुक्ती केलेली असली तरी नंतर त्यत वाढ केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

राज्यातील सरकारी नोकर भरतीवरील बंदी उठवण्यात आली असल्याने आता लवकरच शिक्षक भरतीही पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी खात्याने किती शिक्षक निवृत्त झाले आहेत, तसेच किती पदे रिक्त झाली आहेत, त्यासंबंधीचे सर्वेक्षण सुरू केलेले असून हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ही पदे भरण्यात येणार आहेत असे शिक्षण खात्यातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.