केल्याने देशाटन…

0
83
  • अंजली आमोणकर

प्रवास करणे ही मानवी जीवनाची मूलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे तो एका जागी बसू शकत नाही. गतिमानता जिवंतपणाचे लक्षण ठरते. एका जागी राहून कंटाळलेल्याला प्रवासासारखे साधन उत्साहवर्धक ठरते- हे लॉकडाऊनच्या काळाने सिद्ध केलेलेच आहे.

भारतात प्राचीनकाळापासून देशाटनाची परंपरा दिसते. रामायण-महाभारतसारखी महाकाव्ये, तसेच जैन, बौद्ध यांच्या धर्मग्रंथांत, वारकरी संतांच्या रचनेत देशाटनाचे उल्लेख सापडतात. ‘मेघदूता’सारखे जगप्रसिद्ध संस्कृत खंडकाव्य शापित यक्षाला प्रवास घडल्याने, प्रेमाच्या विराट भावनेतून निर्माण झाल्याचे सर्वश्रुतच आहे. प्रवास करण्याच्या पूर्वापार अशा दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे मानवाने आपल्या बुद्धिचातुर्याने निसर्गाशी नाते जोडत ऋतूंची, पर्वतांची, नक्षत्रांची, नद्यांची, समुद्राच्या भरती-ओहोटीची महिती करून घेतली. तसेच लहान-मोठ्या होड्या-जहाजांची निर्मिती केली. बैल, उंट, घोडे, गाढव आदी प्राण्यांचा प्रवासात बुद्धिचातुर्याने उपयोग करून आपला प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न केला. नवनवीन भूप्रदेश शोधले. आपले जीवन नदीच्या प्रवाहासारखे विस्तारित पुढे नेले.

मेसोपोटेमिया संस्कृतीमुळे पर्यटनाला खूप मोठी चालना मिळाली. या ठिकाणी घडून आलेले नागरीकरण जगाच्या कानाकोपर्‍यांत पोहोचले. ग्रीक संस्कृतीमध्ये विविध धार्मिकस्थळांचा विकास झाल्यामुळे धार्मिक पर्यटनाचा विकास झाला. इ.स. पूर्व ७७६ मध्ये ग्रीकमध्ये ऑलिंपिक स्पर्धा आयोजनास सुरुवात झाली. यामध्ये सहभाग घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येऊ लागले. रोमन कालखंडात मोठ्या प्रमाणात नवनवीन शोध लागले. आर्थिक व राजकीय क्षेत्रात झालेल्या बदलामुळे प्रवास व पर्यटन या संकल्पनेत बदल घडून आला. १५ व्या शतकात युरोपमध्ये इटली सामाजिक व सांस्कृतिक केंद्र बनले होते आणि त्याच काळात ‘ग्रॅण्ड टूर’ ही संकल्पना अस्तित्वात आली. त्याचप्रमाणे ‘समुद्र-विहार’ ही संकल्पनाही प्रसिद्ध झाली. पर्यटन हा उद्योग म्हणून पुढे येऊ लागला. कारण पर्यटक प्रवासाला निघाल्यापासून त्याचा संबंध विविध घटकांशी येतो. मोटर, रेल्वे, विमान, जहाज, निवास, पर्यटन मार्गदर्शक, पर्यटनस्थळी वस्तूंची विक्री करणारे व बाजारपेठ इ. हा संबंध बहुतांशी आर्थिक घटकांशी असतो. त्यामुळे हल्ली पर्यटन हा उद्योग बनला आहे.

प्राचीन पर्यटनातील एक मुख्य उद्देश म्हणजे व्यापार. भारत एक समृद्ध-संपन्न देश म्हणून जगभर प्रसिद्ध होता. हडप्पा, मोहेंजोदडो, तक्षशिला, उज्जैन, प्रतिष्ठान, वैशाली, पाटलीपुत्र, चंपा, नीलकंठ, श्रीवस्ती, तगर ही प्राचीन शहरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. समुद्रमार्गे चीन, ब्रह्मदेश, जावा, सुमात्रा, बॅबीलोन, इराण, रोम येथून व्यापारी भारतामध्ये येत असत.

एकूणच प्राचीन भारतीय लोकांचा प्रवास अथवा पर्यटनाचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की धर्म, व्यापार, शिक्षण, धर्मपरिषदा, संगम इत्यादी माध्यमातून प्रवासाला चालना मिळाली. यातून विविध प्रांतांतील चालीरीती, रूढीपरंपरा, सांस्कृतिक जीवन यांची ओळख होण्यास मदत होत असे. याच कारणामुळे परकीय प्रवासीदेखील भारतात आले. त्या-त्या कालखंडातील विविध कार्यकर्त्यांनी प्रवाशांच्या सोयीकरिता दळणवळण, राहण्याची, जेवण्याची, संरक्षणाची व मार्गदर्शकाची सोय केलेली दिसते. वामन पंडितांनी आपल्याकडेसुद्धा म्हणून ठेवलेलं आहे- ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार! मनुजा चातुर्य येतसे फार.’
सर्वत्र प्रवास केल्याने चातुर्य येते; विद्वानांशी मैत्री केल्याने चातुर्य येते, सभेत संचार केल्याने चातुर्य येते. थोडक्यात काय, सर्वत्र फिरत राहिल्याने चातुर्य येते, असे वामन पंडितांसह अनेक पंडित सांगत आलेत. ‘चराति चर तो भगः’ असे संस्कृतमध्येही सुभाषित आहे. ‘जो चालतो त्याचे भाग्य चालते’ असा त्याचा अर्थ आहे. एके ठिकाणी बसून राहतो तो खपतो. समर्थ रामदासांनीदेखील हेच सांगितले आहे. आचार्य अत्रेही विद्यार्थ्यांना हेच सांगायचे- ‘वाहत्या पाण्याचा झरा व्हा, म्युनिसीपालिटीचा नळ होऊ नका.’ ज्ञानेश्‍वर महाराजही पर्यटनाच्या बाबतीत म्हणतात-
क्षण एक एकांती बैसोनि सहज|
अंतरींचे गुज बोलों काही॥
जीवनमुक्त ज्ञानी जरी जाले पावन|
तरि देवतीर्थ भजन न सांडिती॥
भक्त शिरोमणी धन्य तू संसारी|
परि एक अवधारी वचन माझे॥
भूतळीची तीर्थे पहावीं नयनी|
असे आर्त मनीं विष्णुदासा॥
तुझिया संगतीचे नित्य सुख घ्यावे|
सार्थक करावे संसाराचे|
ऐसी ही उत्कंठा बहु माझे पोटी॥
ज्ञानदेवांकडून देशाटनाचे महत्त्व समजून घेऊन त्यांच्याबरोबर प्रवास करून समृद्ध झालेले नामदेव पुढे ‘नाचू कीर्तनाचे रंगी- ज्ञानदीप लावू जगी’ असे म्हणत समाजप्रबोधनासाठी उत्तर भारतात भ्रमण करते झाले. देशाटनासाठी समृद्ध असे नैतिक अधिष्ठान महत्त्वाचे आहे असे नामदेव सांगून गेले.
‘साधु चलता भला, पानी बहता भला’ यांसारख्या लोकोक्तीतून निःसंग साधूने सतत चालत राहिल्याने त्याची आध्यात्मिक उन्नती, विकास होतो असे सांगितलेले दिसते. तसेच पाणी वाहते असेल तर ते शुद्ध, पिण्यायोग्य राहते. त्याचप्रमाणे मानवी जीवन विकसित, प्रवाही बनायचे असेल तर त्याने प्रवास केला पाहिजे. प्रवास करणे ही मानवी जीवनाची मूलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे तो एका जागी बसू शकत नाही. म्हणूनच त्या व्यक्तीचा लळा लहान मुलांना जास्त लागलेला दिसतो. गतिमानता जिवंतपणाचे लक्षण ठरते. एका जागी राहून कंटाळलेल्याला प्रवासासारखे साधन उत्साहवर्धक ठरते- हे लॉकडाऊनच्या काळाने सिद्ध केलेलेच आहे.