केरळमध्ये ‘सागरमाला’साठी घरे पाडली गोव्यात प्रकल्प नको : ओलेंसियो सिमॉईश

0
13

केंद्र सरकारने सागरमाला प्रकल्पासाठी केरळमधील किनारपट्टी भागांत राहणार्‍या मच्छिमारांची घरे पाडून टाकली असून, हे लोक ज्या ठिकाणी राहत होते, ती गावे सागरमाला प्रकल्पासाठी नांगर फिरवून उद्ध्वस्त करून टाकली आहेत. केंद्र सरकार गोव्यातही सागरमाला प्रकल्प उभारू पाहत असून, गोव्यातील मच्छिमारांचीही किनारपट्टीवरील घरे अशा प्रकारे या प्रकल्पासाठी पाडण्यात येणार असल्याने राज्य सरकारने आम्हाला हा प्रकल्प गोव्यात नको असे केंद्राला कळवावे, अशी मागणी काल मच्छिमारी समाजाचे नेते तथा कॉंग्रेसचे कार्यकर्ते ओलेंसियो सिमॉईश यांनी केरळ राज्यातून प्रसारित केलेल्या एका व्हिडिओ संदेशाद्वारे केली आहे.

सागरमालासाठी बंदरांचा विस्तार केला जात असून, गोव्यातही मुरगाव बंदराचा विस्तार करण्याची केंद्राची योजना आहे. कोळसा वाहतुकीसाठी हे सगळे केले जात असून, या योजनेमुळे केरळ, गोवा व किनारपट्टी असलेल्या अन्य राज्यांत पर्यावरणाचा मोठा विद्ध्वंस होणार आहे. तसेच लोकांना कोळशामुळे होणार्‍या प्रदूषणाचाही सामना करावा लागेल. तसेच राज्यातील पर्यटनालाही या कोळसा प्रदूषणामुळे फटका बसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

१६ व १७ जून रोजी
मच्छिमार संघर्ष यात्रा

या पार्श्‍वभूमीवर राज्यातील मच्छिमार बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी मच्छिमार संघर्ष समितीची राज्यात दि. १६ व दि. १७ जून रोजी यात्रा होणार असल्याचे सिमोईश यांनी सांगितले. मच्छिमार संघर्ष समितीची केरळ येथील यात्रा नुकतीच संपल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या यात्रेत मच्छिमारी समाजाचे देशभरातील नेते सहभागी झाले असल्याची माहिती सिमॉईश यांनी दिली.