केबल न बदलल्यामुळे मोरबी पूल अपघात

0
14

गुजरातमधील मोरबी येथील झुलत्ता पूल ज्या केबलच्या आधारे उभा होता त्या पुलाच्या केबल बदलण्यात आल्या नव्हत्या. पुलाच्या दुरुस्ती कामांतर्गत फ्लोअरिंग बदलण्यात आले होते. त्यामुळे पुलाची दुरुस्ती करणारे कंत्राटदार अशी कामे करण्यास पात्र नव्हते, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. रविवारी संध्याकाळी हा पूल कोसळून १३५ जणांचा मृत्यू झाला. ती केबल बदलण्यात आली नसल्यामुळे बदललेल्या फ्लोअरिंगचे वजन ही केबल पेलवू शकली नाही, असे सरकारी वकिलांनी फॉरेन्सिक अहवालाचा हवाला देऊन दंडाधिकारी न्यायालयात सांगितले.

पूल कोसळल्याप्रकरणी ओरेवा ग्रुपचे दोन व्यवस्थापक आणि दोन उप कंत्राटदारांना अटक करण्यात आली असून न्ययालयाने या चौघांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, सुरक्षारक्षक व तिकीट देणारा क्लर्क यांच्यासह अन्य पाच जणांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. दोन्ही कंत्राटदार दुरुस्तीकामासाठी पात्र नव्हते, असेही न्यायालयात सांगण्यात आले.

या पुलाच्या जीर्ण झालेल्या केबल कंत्राटदाराने बदलल्या नसून, केवळ रंगरंगोटी केल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय दुरुस्तीकार्य डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला देण्यात आलेली असतानाही दिवाळी आणि गुजराती नववर्ष डोळ्यांसमोर ठेवून कंत्राटदाराने २६ ऑक्टोबरलाच हा पूल खुला केल्याचे उघड झाले आहे.