केदारनाथ सिंह

0
160
  • माधव बोरकर

केदारनाथांच्या कवितेत महानगरीय जाणिवा प्रकर्षाने व्यक्त झालेल्या दिसतात. महानगरात किड्यामुंग्यांसारखी जगणारी माणसं त्यांच्या कवितेला आशय देतात. महानगरात जगणार्‍या सामान्य माणसाला त्याची स्वतंत्र अस्मिता जपणारा चेहरा नसतो.

गेल्या एका वर्षात हिंदी कवितेने चार प्रमुख कवी गमावले. चंद्रकांत देवताले, कुंवर नारायण, दूधनाथ सिंह व केदारनाथ सिंह. त्यांच्या मृत्यूमुळे हिंदी कवितेचं अपरिमित नुकसान झालं आहे आणि पर्यायाने भारतीय कवितेचं म्हटलं पाहिजे. देवताले, दूधनाथ सिंह व केदारनाथ सिंह हे एका पिढीचे कवी तर कुंवर नारायण यांच्यापेक्षा वयाने थोडे मोठे पण या कवींच्या संवेदनेचा सूर आळवणारे. प्रत्येक काळाचा आपला असा एक सूर असतो. त्याला कारण असतं ते सामाजिक किंवा राजकीय वास्तवाचे. त्यामुळेच त्या पिढीच्या कवींच्या कवितेत काही समान घटक आढळून येतात. काळाचा तो अटळ परिणाम असतो.
केदारनाथ म्हणतात —

ठण्डसे नही मरते शब्द | वे मर जाते हैं साहस की कमी से |
कई बार मौसम की नमी से | मर जाते हैं शब्द…

… शब्दांच्या घट्ट पायावर कवितेचे स्थापत्य उभे असते. शब्दच कवितेला आकार देत असतात. हा शब्द कवीला वेगवेगळ्या रूपात दिसतो. कधी तो लाल पक्षासारखा दिसतो. कवी त्याला घरी आणतो. पण तो एक वेळा कवीकडे पाहतो व प्राण सोडतो. तेव्हापासून ‘मै डरने लगा शब्दोंसे’ अशी कवीची अवस्था होते. सामाजिक जाणिवेचं भान असलेला कवी वर्तमान काळाचा साक्षीदार असतो. कवी पुढे म्हणतो की कालचीच गोष्ट म्हणजे रस्त्यावर त्याला पाच-सात स्वस्थ सुंदर शब्दांनी घेरून टाकले. त्यांचे चेहरे झाकलेले होते व त्यांच्या हातात धारदारसारखी वाटणारी कसलीशी वस्तू होती. त्यांच्यासमोर कवी घामाघूम होऊन उभा राहतो. त्याची संभ्रमित अवस्था होते.
फिर मैं भागा
अभी मेरा एक पॉंव हवा में उठा ही था
कि न जाने कहॉंसे एक कुबडा-सा शब्द
हॉंफता हुआ आया
और बोला – ‘चलो, पहुँचा दूँ घर!’

केदारनाथांच्या अनेक कवितांना कथात्मक बैठक आहे. आशयाची मांडणी सरळ शब्दात करण्यापेक्षा रूपकाचा सढळ वापर करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे सामाजिक कवितेत आवाजीपणा येतो तो इथे टाळला जातो व अभिव्यक्ती अधिक धारदार बनते. केदारनाथांना सामाजिक जाणिवेचे वावडे नव्हते. पण ही जाणीव व्यक्त होताना कवितेचे सौंदर्यमूल्य जपले पाहिजे याचे त्यांना भान होते. म्हणूनच या कवितेचा उदय झाला तेव्हा तिनं ज्येष्ठ कवी अज्ञेय ते त्यांचे समकालीन कवींच्या पिढीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तिच्यात दडलेल्या सूक्ष्म काव्यशक्तीची जाण त्यांना झाली. तसं पाहिलं तर भाववृत्ती व कल्पनाशक्ती यांचा सुरेख मेळ त्यांच्या कवितेत दिसून येतो तो हिंदी कवितेत केवळ अपूर्व आहे असं म्हटलं पाहिजे. सामाजिक वास्तव हा तिचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. छायावाडी कवितेची गूढगुंजनता तिच्यात अभावानेच आढळून येते. जे काही सांगायचं आहे ते ती रोखठोक सांगून टाकते.

तुमने अकेले आदमी को पहाड से उतरते हुए देखा है?
मैं कहुँगा – कविता|
एक शानदार कविता|

एखादी कविता समोर आली की तिची ओळख सहजपणे पटायला पाहिजे ही त्यांची कवितेविषयीची भूमिका रास्त वाटते. गोंधळात टाकणारी संदिग्धता कवितेच्या आस्वादाला मारक ठरत असते. त्यामुळे काव्याचा भोक्ता तिच्यापासून दूर जातो या गोष्टीवर या कवीचा विश्‍वास आहे.
केदारनाथांच्या कवितेत महानगरीय जाणिवा प्रकर्षाने व्यक्त झालेल्या दिसतात. महानगरात किड्यामुंग्यांसारखी जगणारी माणसं त्यांच्या कवितेला आशय देतात. महानगरात जगणार्‍या सामान्य माणसाला त्याची स्वतंत्र अस्मिता जपणारा चेहरा नसतो. माणसं जगतात पण माणसामाणसात एक प्रकारचा तुटलेपणा असतो; हे तुटलेपणाचे नाते ही कविता अधोरेखित करते- ‘टुटा हुआ ट्रक’ सारखी कविता त्या दृष्टीने महत्त्वाची वाटते. एक मोडलेला ट्रक कवीला दिसतो. त्याचे दिवे फुटलेले आहेत. एक झाडाची फांदी त्याच्या हॉर्नपाशी झुकलेली आहे. कदाचित तो वाजेल या आशेने… हा ट्रक दुरुस्त व्हावा अशी कोणाची इच्छा दिसत नाही. ट्रकखाली असलेलं गवतही हैराण आहे. कवी म्हणतो तरीही….

‘कि कल सुबह तक सब ठीक हो जाएगा| मैं उठूंगा|
और अचानक सुनुंगा भोंपूकी आवाज और घरघराता हुआ ट्रक चल देगा|
तिनसुकिया या बोकाजान …’

… पण हा ट्रक काही जागचा हलत नाही आणि हलण्याची शक्यताही दिसत नाही. ट्रक हे आजच्या समाज व राजकीय परिस्थितीचे प्रतीक असू शकते. कवितेतल्या ट्रकसारखी ही व्यवस्था मोडकळीला आलेली आहे, असंच कवीला सुचवायचं तर नसेल?
केदारनाथची कविता प्रासंगिक आहे असं काही समीक्षकांना वाटतं. थॉम गन या इंग्रजी कवी समीक्षकाने म्हटले आहे की ‘‘तसं पाहिलं तर प्रत्येक कविता कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रासंगिक असते. तिचे चिरंतन मूल्य काळाची कसोटी ठरवत असते.’’ गन शेक्सपिअरचा समकालीन बेन जॉन्सनच्या कवितेच्या संदर्भात लिहितो. केदारनाथने म्हटले आहे….

इन्तजार मत करो
जो कहना हैं|
कह डालो
क्योंकी हो सकता है
फिर कहने का कोई अर्थ न रह जाय|