कॅसिनोंना युवा कॉंग्रेसचा विरोध

0
288

>> राज्यपालांना निवेदन सादर

गोवा प्रदेश युवा कॉंग्रेस समितीने काल गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केलेल्या एका निवेदनात मांडवी नदीतील बंद असलेले कॅसिनो पुन्हा सुरू करण्यास तीव्र विरोध दर्शविला. हे कॅसिनो सुरू केल्यास तेथे जुगार खेळण्यास देश-विदेशांतील पर्यटक गर्दी करणार असून त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याचे युवा कॉंग्रेसने या निवेदनात म्हटले आहे.

हे कॅसिनो सुरू करणे म्हणजे या महामारीच्या काळात कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे, असे युवा कॉंग्रेसने म्हटले आहे. तसेच महसूल गोळा करण्यासाठी हे कॅसिनो सुरू करून सरकारने जनतेच्या जीवाशी खेळ मांडू नये, असा इशाराही दिला. गोवा अजून कोरोना महामारीतून सावरलेला नसून अशा परिस्थितीत हे कॅसिनो सुरू करणे सरकारने टाळावे, अशी मागणी युवा कॉंग्रेसने केली आहे.

कर्नाटकने कळसा मंडुरा प्रकल्प उभारून म्हादई नदीचे पाणी कर्नाटकात वळवले असून त्यामुळे मांडवी नदीच्या प्रवाहावर मोठा परिणाम झाला आहे. हे पाणी कमी झालेले असतानाच या नदीतील कॅसिनोंमुळे हे पाणी प्रदूषित होऊ लागले आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या अटींचे हे कॅसिनो पालन करीत नाहीत. त्यामुळे मांडवी नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे कॅसिनो सुरू केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही युवा कॉंग्रेसने दिला आहे. युवा कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस जर्नादन भंडारी, कॉंग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने वरील निवेदन राज्यपालाना दिले.