‘कॅब ॲग्रीगेटर’ला टॅक्सी चालक-मालकांचा विरोध

0
2

नियुक्तीला आक्षेप घेणारे शेकडो अर्ज वाहतूक खात्यात सादर

राज्यात गोवा वाहतूक ॲग्रीगेटर नियुक्ती मसुद्याचा विषय तापू लागला आहे. राज्य सरकारच्या गोवा वाहतूक ॲग्रीगेटर नियुक्तीला टॅक्सी मालक- चालकांनी विरोध करून काल वाहतूक ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे 2025 च्या मसुद्याला आक्षेप घेणारे शेकडो अर्ज वाहतूक खात्याच्या मुख्यालयात सादर केले. सरकारच्या वाहतूक खात्याने 20 मे 2025 रोजी अधिसूचित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये राज्यात ॲप-आधारित राइड-हेलिंग सेवांना औपचारिकपणे परवानगी देण्यासाठी एक नियामक चौकट प्रस्तावित आहे. टॅक्सी वाहतूक क्षेत्रातील भागधारकांना त्यांचे अभिप्राय सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या वाहतूक ॲग्रेीगेटर मसुद्याला राज्यातील टूरिस्ट टॅक्सी मालक-चालकांकडून विरोध केला जात आहे. राज्यातील टूरिस्ट टॅक्सी मालकांनी बैठका घेऊन या मसुद्याला विरोध करणारे अर्ज सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, टूरिस्ट टॅक्सी मालकांकडून स्थानिक आमदारांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली जात आहे.

पणजीतील जुन्ता हाउसमधील वाहतूक खात्याच्या मुख्यालयाबाहेर टूरिस्ट टॅक्सी चालकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कार्यालयाच्या परिसरात उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. तसेच, कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे जुन्ता हाउस इमारत परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

टॅक्सीवाल्यांना विश्वासात
घेतले नसल्याचा आरोप

राज्य सरकारने वाहतूक ॲग्रीगेटर नियुक्तीसंबंधी धोरणाचा मसुदा जाहीर करताना टूरिस्ट टॅक्सी मालकांना विश्वासात घेतले नाही. राज्य सरकारने वाहतूक ॲग्रीगेटर प्रश्नी हुकूमशाहीचा कारभार चालविली आहे. राज्यातील टॅक्सी व्यवसाय टॅक्सी ॲपच्या माध्यमातून खासगी कंपन्यांना देण्याचा डाव आहे, असा आरोप टॅक्सी मालकांचे नेते योगेश गोवेकर यांनी केला.

ॲप आधारित सेवा ः गुदिन्हो
राज्य सरकारने टॅक्सी ॲग्रीगेटर नियुक्तीचा मसुदा जारी केला आहे. त्यावर सूचना, हरकतीसाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. गोव्यात ॲपवर आधारित अधिकाधिक सेवा येण्याची गरज आहे, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे. टॅक्सी ॲग्रीगेटरप्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची मंगळवारी भेट घेणार आहोत. स्थानिक टॅक्सी मालकांना हवे तसे बदल मसुद्यात होणे गरजेचे आहे, असे े आमदार मायकल लोबो यांनी म्हटले आहे.

टॅक्सी मालकांचे म्हणणे ऐकणार ः बाबूश
राज्यातील टूरिस्ट टॅक्सी व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी ॲप अग्रीगेटर धोरण तयार केले आहे. हे धोरण स्थानिक टॅक्सी मालकाच्या विरोधात नाही. या धोरणाबाबत सूचना देण्यासाठी एक महिन्याचा कालावधी आहे. सरकार टॅक्सी मालकांचे म्हणणे ऐकून पुढील निर्णय घेणार आहे, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी टॅक्सी मालकांच्या शिष्टमंडळाला काल सांगितले.