कॅपिटल्सचा ९९ धावांत खुर्दा

0
129

>> दिल्लीवरील विशाल विजयासह चेन्नई पुन्हा टॉपवर

कर्णधार धोनीची अष्टपैलू कामगिरी व फिरकीपटूंच्या भेदक मार्‍याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला ८० धावांनी लोळवून गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील ५०व्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १७९ धावा उभारून दिल्लीचा डाव ९९ धावांत गुंडाळला.
१८० धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली.
दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ या सामन्यातही अपयशी ठरला. अवघ्या ४ धावा काढून तो माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हरभजनचा चेंडू ‘स्वीप’ करण्याच्या नादात धवनचा त्रिफळा उडाला.

यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली. एकामोगामाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. इम्रान ताहीर व रवींद्र जडेजा या दुकलीने दिल्लीची मधली फळी कापून काढली. या दोघांना धोनीच्या चपळ यष्टिरक्षणाची जोड लाभल्यामुळेच दिल्लीला शतकी वेसदेखील ओलांडणे शक्य झाले नाही. ख्रिस मॉरिस व श्रेयस अय्यर यांना बाद करताना धोनीने दाखवलेली चपळता अद्वितीय होती. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने एका बाजूने किल्ला लढवताना ४४ धावा केल्या. दिल्लीकडून फिरकीपटू इम्रान ताहीरने ४ तर रवींद्र जडेजाने ३ बळी घेतले. त्यांना दीपक चहर, हरभजन यांनी प्रत्येकी १ बळी घेत चांगली साथ दिली.

तत्पूर्वी, सुरेश रैनाचे अर्धशतक आणि महेंद्रसिंग धोनीच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने गोलंदाजांना मदत करणार्‍या घरच्या मैदानावर १७९ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या डावाची सुरुवात खराब झाली. शेन वॉटसन भोपळाही न फोडता जगदीश सुचितच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ९ चेंडूंचा सामना केला. यानंतर सुरेश रैना आणि फाफ ड्युप्लेसी यांनी दुसर्‍या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी केली. रैना मुक्तपणे फलंदाजी करत असताना ड्युप्लेसीला मात्र धावा जमवण्यासाठी झगडावे लागले. अक्षर पटेलने ‘लॉंग ऑफ’वर शिखर धवनकरवी ड्युप्लेसीला बाद करत संघाला दुसरे यश मिळवून दिले. यानंतर सुरेश रैनाने आपले अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या मोसमातील त्याचे हे केवळ दुसरे व आयपीएलमधील एकूण ३७वे अर्धशतक ठरले. रैना परतल्यानंतर
यानंतर महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा यांनी दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली. दिल्लीच्या गोलंदाजांनी काल आश्‍वासक कामगिरी केली. जगदीश सुचितने २ तर ख्रिस मॉरिस आणि अक्षर पटेल जोडीने प्रत्येकी १ बळी घेतला.
दिल्लीने या सामन्यासाठी संदीप लामिछानेला वगळले. पाठदुखीमुळे कगिसो रबाडाला तर घोट्याच्या दुखापतीमुळे इशांत शर्माला विश्रांती दिली. या तिघांची जागा ट्रेंट बोल्ट, ख्रिस मॉरिस व जगदीश सुचित यांनी घेतली.
दुसरीकडे चेन्नईने मिचेल सेंटनर, ध्रुव शोरे व मुरली विजय यांना बाहेरचा रस्ता दाखवत फाफ ड्युप्लेसी व रवींद्र जडेजा यांना पुन्हा संघात घेतले. पाठदुखीमुळे विश्रांती घेतलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीचेदेखील संघात पुनरागमन झाले.

धावफलक
चेन्नई सुपरकिंग्स ः फाफ ड्युप्लेसी झे. धवन गो. पटेल ३९, शेन वॉटसन झे. पटेल गो. सुचित ०, सुरेश रैना झे. धवन गो. सुचित ५९ (३७ चेंडू, ८ चौकार, १ षटकार), महेंद्रसिंग धोनी नाबाद ४४ (२२ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार), रवींद्र जडेजा झे. व गो. मॉरिस २५ (१० चेंडू, चौकार, २ षटकार), अंबाती रायडू नाबाद ५, अवांतर ७, एकूण २० षटकांत ४ बाद १७९
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ४-०-३७-०, जगदीश सुचित ४-०-२८-२, ख्रिस मॉरिस ४-०-४७-१, अक्षर पटेल ३-०-३१-१, अमित मिश्रा ३-०-१६-०, शर्फेन रुदरफर्ड २-०-१९-०

दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. रैना गो. चहर ४, शिखर धवन त्रि. गो. हरभजन १९, श्रेयस अय्यर यष्टिचीत धोनी गो. जडेजा ४४, ऋषभ पंत झे. ब्राव्हो गो. ताहीर ५, कॉलिन इंग्राम पायचीत गो. जडेजा १, अक्षर पटेल झे. वॉटसन गो. ताहीर ९, शर्फेन रुदरफर्ड झे. चहर गो. ताहीर २, ख्रिस मॉरिस यष्टिचीत धोनी गो. जडेजा ०, जगदीश सुचित धावबाद ६, अमित मिश्रा झे. धोनी गो. ताहीर ८, ट्रेंट बोल्ट नाबाद १, अवांतर ०, एकूण १६.२ षटकांत सर्वबाद ९९
गोलंदाजी ः दीपक चहर ३-०-३२-१, हरभजन सिंग ४-०-२८-१, इम्रान ताहीर ३.२-०-१२-४ रवींद्र जडेजा ३-०-९-३, ड्वेन ब्राव्हो ३-०-१८-०

नेस वाडियामुळे बीसीसीआयची नाचक्की
किंग्स इलेव्हन पंजाबचा सहमालक नेस वाडिया याला जपानमध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाडियाच्या या कृत्यामुळे ‘बीसीसीआय’ची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. तसेच पंजाब संघाचे भविष्यही धोक्यात आणले आहे. आयपीएलच्या नियमानुसार संघ खेळाडू, संघाचा पदाधिकारी व अन्य कोणत्याही सदस्याने आपला संघ आणि बीसीसीआयच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण होणारी कृती करणे अपेक्षित नाही. मात्र वाडियाला सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे बीसीसीआयला मान खाली घालावी लागली आहे. त्यामुळे पंजाबच्या संघावरही कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.