कृष्णप्पा गौतमची हॅट्‌ट्रिक

0
131

भारत ‘अ’ व वेस्ट इंडिज ‘अ’ यांच्यात सुरु असलेल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात ऑफस्पिनर कृष्णप्पा गौतम याने काल हॅट्‌ट्रिकची नोंद केली.

गौतमने आपल्या २४व्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर सर्वप्रथम रेयमन रिफर याचा वैयक्तिक ५ धावांवर त्रिफळा उडवला. यानंतर पुढील चेंडूवर चेमार होल्डरची यष्टी वाकवली. लगेचच मिगेल कमिन्सला पायचीतच्या सापळ्यात अडकवत हॅट्‌ट्रिक पूर्ण करताना विंडीजचा डाव संपवला. भारत ‘अ’ संघाकडून कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हॅटट्रीक नोंदवणारा कृष्णप्पा गौतम पहिला गोलंदाज ठरला आहे. गौतमने डावात ६७ धावा मोजून एकूण ६ गडी बाद केले.

भारताने प्रथम फलंदाजी करताना हनुमा विहारी आणि वृध्दिमान साहाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २०१ धावांचा टप्पा गाठला.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या विंडीज ‘अ’ संघाची चांगली सुरुवात झाली होती. मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना करणे शक्य झाले नाही. त्यांचा डाव १९४ धावांत संपला. कृष्णप्पाच्या कामगिरीमुळे भारत अ संघाला पहिल्या डावात ७ धावांची नाममात्र आघाडी तरी मिळाली. मात्र दुसर्‍या डावातील भारताची सुरुवात खराब झाली आहे. भारताचे सलामीचे ३ फलंदाज झटपट माघारी परतले असून केवळ २३ धावा फलकावर लागल्या आहेत.