कृष्णदास श्यामा ग्रंथालयाच्या एसी यंत्रणेबाबत अहवाल द्या

0
16

>> उच्च न्यायालयाचा आदेश

कृष्णदास श्यामा गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील वातानुकूलित यंत्रणेची स्थिती सध्या काय आहे आणि तेथील जुनी व दुर्मीळ अशी पुस्तके खराब होऊ नयेत म्हणून कोणती पावले उचलण्यात आली आहेत त्या संबंधीचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर करण्यात यावे असा आदेश काल उच्च न्यायालयाने राज्य ग्रंथपालांना दिला आहे.
राज्यातील मध्यवर्ती ग्रंथालयातील वातानुकूलित यंत्रणा बंद पडली असून त्यामुळे ह्या ग्रंथालयातील जुन्या व दुर्मीळ अशा पुस्तकांवर वाईट परिणाम होऊ लागलेला आहे. ही अनमोल अशी पुस्तके खराब होण्याची भीती निर्माण झाली असल्याचे वृत्तपत्रात जे वृत्त आले आहे त्याची स्वेच्छा दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य ग्रंथपालांना वरील आदेश दिला आहे.
राज्य ग्रंथपालांनी वरील संबंधीची सगळी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला द्यावी तसेच बिघडलेली वातानुकूलित यंत्रणा सुरू करण्यासाठी किती वेळ लागेल हे स्पष्ट करतानाच ही वातानुकूलित यंत्रणा दुरुस्त करण्यासंबंधीची सरकारी फाईल लालफितीत का अडकून पडली आहे आणि ही यंत्रणा सुरू करण्याबाबतीत कोणत्या अडचणी येत आहेत आणि ते कधीपर्यंत सुरू करण्यात येईल आणि तोपर्यंत ग्रंथालयातील पुस्तके सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती पावले उचलली जातील हे सरकारने स्पष्ट करावे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले
आहे.