कृषी कायद्यांविरोधात देशभर जागृती करणार ः राकेश टिकैत

0
210

>> ६ रोजी देशात चक्का जाम

नव्या कृषी कायद्यांविरोधात भारतीय किसान युनियन देशभरात जागृती करणार आहे. आपण देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन मोहीम राबवणार असल्याचे काल भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी जाहीर केले. तसेच शेतकर्‍यांनी ६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी ‘चक्का जाम’ची घोषणादेखील केली आहे.

राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना ‘जोपर्यंत केंद्र सरकार कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत घऱवापसी नाही’ असा इशारा देतानाच हे शेतकरी आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही असेही म्हटले आहे.

संजय राऊत-टिकैत भेट
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर गाझीपूर येथे टिकैत यांची काल भेट घेतली. यावेळी राऊत यांनी शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. या भेटीसंबंधी बोलताना राकेश टिकैत यांनी, जर विरोधक येऊन आम्हाला पाठिंबा देत असतील तर त्यामध्ये काहीच समस्या नाही. पण त्यांनी याचे राजकारण करू नये. तसेच जर कोणी नेते भेटायला येत असतील तर आम्ही काहीच करू शकत नसल्याचे म्हटले आहे.

६ रोजी चक्का जाम
दरम्यान, शनिवार दि. ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी ही घोषणा केली आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत राज्य तसेच राष्ट्रीय महामार्ग रोखले जाणार आहेत. दिल्ली व आसपासच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याबद्दल तसेच इतर मुद्द्यांवरून हे आंदोलन केले जाणार असल्याच राजेवाल यांनी सांगितले.
धरणे आंदोलनामुळे स्थानिक नागरिकही संतापलेले आहेत. शेतकर्‍यांनी सीमा खाली करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

राज्यसभेत गदारोळ
राज्यसभेत काल मंगळवारी शेतकरी आंदोलनावरून गदारोळ झाला. विरोधी पक्षांनी निर्धारित कामकाज स्थगित करून, शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर तत्काळ चर्चा करण्याची मागणी सभापतींकडे केली होती. मात्र ही मागणी सभापतींनी फेटाळल्याने विरोधकांनी सभात्याग केला. यात कॉंग्रेस, डावे पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, राजद, द्रमुक या विरोधी पक्षांच्या खासदारांचा समावेश होता. सभापती व्यकंय्या नायडू यांनी ही मागणी अमान्य करताना उद्या चर्चा होईल तेव्हा सदस्य आपले मुद्दे मांडू शकतात असे सांगितले. मात्र हा प्रस्ताव विरोधकांनी मान्य केला नाही.