कूळ कायदा दुरुस्ती, वटहुकूम विरोधात युवक कॉंग्रेस आक्रमक

0
85

भूसंपादन कायद्यासाठी केंद्र सरकारने जारी केलेला वटहुकूम तसेच गोवा सरकारने कूळ कायद्यात केलेल्या दुरुस्तीच्या विरोधात प्रदेश युवक कॉंग्रेस सोमवारपासून चळवळ उभारणार असल्याचे प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झेवियर पिएल्लो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.भूसंपादनासाठी जारी केलेल्या वटहुकूमामुळे देशातील सर्व शेत जमिनी व भूविकासक व इमारत बांधकाम उद्योजक तसेच अन्य उद्योजकांच्या घशात जाण्याचा बराचसा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप सत्तेवर आल्याच्या दिवसापासून त्यांनी शेतकरी विरोधी धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे वरील वटहुकूम हा काळा वटहुकूम मानून पक्षाने राष्ट्रीय पातळीवर शेतकर्‍यांच्या हितासाठी किसान सत्याग्रह सुरू करण्याचे ठरविले आहे.
येत्या सोमवारी वरील वटहुकूम मागे घेण्याच्या मागणीसाठी सरकारला निवेदन सादर केले जाईल व ते सादर केल्यानंतरही सरकारने वटहुकूम मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचे झेवियर पिएल्लो यांनी सांगितले.
गेल्या ७ महिन्याच्या काळात केंद्र सरकारने ९ वटहुकूम जारी केले आहेत. त्यामुळे भाजपचा लोकशाहीवर विश्‍वास नाही हे सिद्ध झाल्याचे प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले.