कुरेशी यांना मिझोराम राज्यपालपदावरून डच्चू

0
155

मिझोरामचे राज्यपाल आझिझ कुरेशी यांची अखेर या पदावरून केंद्र सरकारने काल गच्छंती केली. त्यांना या पदावरून हटविण्यासाठी प्रारंभी हालचाली सुरू झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र काल राष्ट्रपती भवनातून त्यांना राज्यपालपदावरून हटविण्यात येत असल्याचे निवेदन जारी करण्यात आले.आता मिझोरामचे राज्यपाल म्हणून प. बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी तात्पुरता कार्यभार सांभाळतील असेही या निवेदनात नमूद केले आहे. कुरेशी यांचा कार्यकाल मे २०१७ पर्यंत होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वप्रथम कमला बेनिवाल यांना राज्यपालपदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर कुरेशी हे अशी कारवाई होणारे दुसरे राज्यपाल ठरले आहेत.
महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल शंकरनारायणन यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र त्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला होता. कुरेशी यांची युपीए सरकारने राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यांना मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी यांनी राजीनामा देण्यास सुचविल्यानंतर त्यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आधीच्या युपीए सरकारने नियुक्त केलेल्या बर्‍याच राज्यपालांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले.