कुटबण जेटीवर 180 कॉलराबाधित

0
10

कुटबण मच्छीमार जेटीवर कॉलराचा उद्रेक झालेला आहे. आतापर्यंत 180 कामगारांना कॉलराची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. या जेटीवरील अनेक कामगार सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार घेत आहेत. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कॉलरामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 1 सप्टेंबरपासून आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. दरम्यान, या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी बोटमालकांनी सरकारला सहकार्य करावे, अन्यथा आम्हाला जेटी सील करावी लागेल, असा इशारा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिला आहे.

आणखी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती : हळर्णकर

दक्षिण गोव्यातील कुटबण जेटीवर स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आलेले असून या जेटीवर लक्ष ठेवण्यासाठी आता आणखी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती काल मच्छिमारी खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली. पूर्वी या जेटीवर लक्ष ठेवण्यासाठी मच्छिमारी खात्याने केवळ एकाच कर्मचाऱ्याची नियुक्ती केली होती. पण आता तेथे आणखी दोघा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे हळर्णकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या जेटीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर जेटीवर स्वच्छता करण्याचे काम तात्काळ हाती घेण्याचा आदेश दिला होता. आता तेथील बोटींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची व त्यांना सगळ्या सोयी-सुविधा पुरवण्याची सूचना बोटमालकांना देण्यात आली असल्याचे हळर्णकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी बोटमालकांना जे सूचनावजा आदेश दिले होते त्याची अमलबजावणी केली जात आहे की नाही याकडेही मच्छिमारी खात्याचे लक्ष असल्याचे हळर्णकर यांनी सांगितले.