कुंकळ्‌ळीत व्यावसायिकाला लुटणार्‍या ६ जणांच्या मुसक्या आवळल्या

0
138

>> पोलिसांची २४ तासांत यशस्वी कारवाई

>> रात्रीच्या वेळी घातला होता दरोडा

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील भाटे, वेरोडा येथे निर्जन रस्त्यावर व्यापारी व्हिसेंत पिरीस (७३) आपले दुकान बंद करून रात्री घरी जात असताना सहा जणांनी दरोडा घालून मारहाण करून त्यांच्या बॅगेतील ३५ हजार लुटण्याची घटना सोमवारी रात्री घडली. यानंतर पिरीस यांना जखमी अवस्थेत टाकून फरारी झालेल्या सहाही संशयितांना कुंकळ्‌ळी पोलिसांनी शिताफीने २४ तासांच्या आत पकडले आहे.

कुंकळ्ळी पोलीस निरीक्षक व्हिल्सन डिसौझा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. अटक केलेल्या संशयितांमध्ये दोन अल्पवयीन असून दोन स्थानिक व दोन परप्रांतिय आहेत. जॉय इनासियो पेरेरा (नेसाय – २२), अनिल विष्णू इतागर (आंबावली – २४), सुजीत कुमार महेश रॉय (२१), मूळ बिहार – आता आंबावली, मुजीफ महमद हुसेन पठाण (आंबावली – २३) याना अटक केली. दोन अल्पवयीन संशयितांना अपना घरांत पाठविले आहे.

व्हिसेंत पिरीस यांचे कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत दारूचे घाऊक दुकान आहे. सोमवारी रात्री १०.३० वाजता दुकान बंद करून ते वेरोडा येथे आपल्या घरी जात होते. त्यांच्या पाठीमागून त्यांचा पुत्र नेरी पिरीस येणार होता. भाटी, वेरोडा येथे दरोडेखोरांनी व्हिसेंत यांच्या मोटारसायकलच्या पुढे आपल्या मोरटसायकली आडव्या घातल्या व त्यांना खाली पाडले. त्यानंतर मारहाण करून पैशांची बॅग पळविली. दरम्यान, वडिलांच्या मागोमाग घरी परतणार्‍या नेरीला वडील रस्त्यावर पडलेले दिसले. त्याने आरडाओरडा करून लोकांना बोलावले व कुंकळ्ळी पोलिसांना खबर दिली व जखमी व्हिसेंतला हॉस्पिटलात दाखल केले.

कुंकळ्ळी पोलीस निरीक्षक व्हिल्सन डिसौझा यांनी जलदगतीने तपास सुरू केला. पुत्र नेरीने वाटेत भेटलेल्या व्यक्तीचे नाव सांगताच त्या दिशेने तपास सुरू झाला. पोलीस अधिक्षक अरविंद गांवस, उपअधिक्षक सेराफीन डायस यांनी दक्षिण गोव्यातील सर्व पोलिसांना सतर्क केले व घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. अधिक्षक गांवस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र तपास करून काल दुपारी सर्व दरोडेखोरांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून तीन मोटरसायकली हस्तगत केल्या असून त्यांतील दोन चोरीच्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.