किनारे स्वच्छता घोटाळ्यास परूळेकर जबाबदार : खंवटे

0
92

>>मंत्री परूळेकरांविरुध्द लोकायुक्तांकडे तक्रार

राज्यातील किनार्‍यांची स्वच्छता करण्यासाठी भूमिका क्लिन टॅक सर्व्हिसेस प्रा.लि. व राम क्लिनर्स ऍण्ड डेव्हलॉपमेंट प्रा. लिमीटेड या कंपनीला दिलेल्या कंत्राटामागे ८० कोटी रुपयांचा घोटाळा असून या प्रकरणी पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर जबाबदार आहेत, असा आरोप करून पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी काल मंत्री परूळेकर व संबंधित कंपनीच्या संचालकांविरुध्द गोवा लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना साक्षीदार केले आहे.
विधानसभेतही हा विषय आपण उपस्थित केला होता. परंतु आरोपीवर कारवाई करण्याचे सरकारने टाळले. पोलीस खाते मुख्यमंत्र्यांच्याच अधिकाराखाली येते. त्यामुळे तेथेही तक्रार करून फायदा नाही. त्यामुळेच आपण लोकायुक्तांकडे तक्रार केल्याचे आमदार खंवटे यांनी सांगितले.
लोकायुक्तपदी असलेले पी. के. मिश्रा हे पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे खंवटे यांनी सांगितले. किनारे स्वच्छ न करताच वरील कंत्राटदारांना लाखो रुपये दिले आहेत असे खंवटे म्हणाले.
पुढील आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी वरील कंपन्यांचे कंत्राट ताबडतोब रद्द करून घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी खंवटे यांनी केली आहे. निविदेमध्येच गोंधळ असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मान्यता दकशी दिली, याचे आश्‍चर्य वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी वरील घोटाळ्याचे गांभिर्य लक्षात घेऊन परूळेकर यांची मंत्रीपदावरून उचलबांगडी करावी, अशी मागणी खंवटे यांनी केली आहे.