किनारा सुरक्षिततेवरून पर्यटनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : कॉंग्रेसची मागणी

0
122

किनारा सुरक्षिततेच्या प्रश्‍नावरून पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काल कॉंग्रेस प्रवक्त्या ऍड. स्वाती शेट केरकर यांनी एका पत्रकाद्वारे केली. जर आजगांवकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांना पदच्युत करावे, अशी मागणीही केरकर यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.

मागील एका आठवड्यात समुद्रात बुडून दोन पर्यटकांचा दुर्देवी मृत्यु झालेला असून त्याची जबाबदारी स्वीकारून आजगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केरकर यांनी केली आहे. वरील घटनांमुळे किनारे सुरक्षा व जीवरक्षक सुविधांचा भोंगळ व गलथान कारभार उघड झाला असल्याचे केरकर यांनी म्हटले आहे. किनारे सुरक्षा व जीवरक्षक कंत्राटदाराला जे १४१ कोटी रु. दिले होते ते कुठे गेले या कॉंग्रेसने केलेल्या प्रश्‍नाचे उत्तरही मुख्यमंत्री देत नसून त्यात काळेबेरे असावे हे यावरून दिसून येत असल्याचे केरकर यांनी म्हटले आहे. मुंख्यमंत्र्यांना गोवा ‘जलसमाधी स्थळ’ म्हणून पुढे आणायचे आहे काय? असा प्रश्‍न करून दोन मृत्यू होऊनही पर्यटन खात्याने याविषयी खेद व्यक्त केलेला नाही. यावरून सरकार असंवेदनशील आहे हे सिद्ध होत असल्याचा आरोप केरकर यांनी केला आहे. गिरीश चोडणकर यांनी केलेल्या जीवरक्षक सुविधा कंत्राट तसेच किनारे स्वच्छता कंत्राट यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी पूर्ण करावी असेही केरकर यांनी म्हटले आहे.