दुचाक्यांची एकमेकांना धडक बसून तिघे जण ठार आणि दोघे गंभीर जखमी होण्याची घटना धक्कादायक आहे. एखाद्या चार चाकी वाहनाची दुचाकीला धडक बसून अशा प्रकारचा भीषण अपघात घडणे शक्य असते, परंतु दोन दुचाक्यांचीच एकमेकांना एवढ्या भीषण तर्हेने धडक बसून तिघांना प्राण गमवावे लागण्याची ही घटना गोव्यातील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा कसे वाजलेले आहेत, हे सांगण्यास पुरेशी आहे. गोव्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड आहे आणि एखादा भीषण अपघात घडला की त्याबाबत चर्चा होते, काय काय करायला हवे याची जंत्री वाचली जाते, परंतु काही दिवस उलटले की सगळ्यांना विसर पडतो आणि पुढच्या अपघाताला आपसूक आमंत्रण मिळते. काणका येथील अपघाताचा विचार केला तर त्यात एका दुचाकीवर तिघेजण स्वार होते. दोन्हीही दुचाकीस्वार भरधाव होते हे तर स्पष्टच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे यापैकी कोणाच्याही डोक्यावर हेल्मेट नव्हते. त्यामुळे अपघात होताच रस्त्यावर रक्ताचे लोट वाहिले आणि तीन कर्तेसवरते तरूण हकनाक बळी गेले. हा अपघात रात्री अकराच्या सुमारास झाला, त्यामुळे या स्वारांपैकी एखादा मद्यधुंद अवस्थेतही असू शकतो.
असे किती बळी आपण देत राहणार आहोत हा खरा सवाल आहे. गोव्यात ‘मार्ग’सारखी संस्था वाहतूक संस्कृतीची रुजवण करण्यासाठी सातत्याने कार्य करीत आहे. मात्र, त्यांचा सुरक्षित वाहन चालवण्यासंबंधीचा संदेश कोणी कानी मनी घेतलेला दिसत नाही. गोव्यातील वाहतूक नियंत्रण व्यवस्थेबाबत तर काय बोलावे! सरकारे आली आणि गेली तरी त्यात तसूभरही फरक पडलेला दिसत नाही. कालच्या अपघातानंतर विरोधी पक्षनेत्यांनी तत्परतेने पत्रकार परिषद घेऊन हेल्मेट सक्ती लागू करण्याची मागणी केली. खरे तर वाहतूकमंत्र्यांनी राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्याची घोषणा विधानसभेत केलेली होती. तिचे पुढे काय झाले हा प्रश्न त्यांनी विचारायला हवा होता. हेल्मेट सक्तीसंदर्भात गोव्यात जो प्रकार एवढी वर्षे होत आला आहे तो त्यामागील इराद्यांबाबतच शंका निर्माण करणारा आहे. काही दिवस हेल्मेट सक्तीचा तमाशा करायचा, धडाधड तालांव द्यायचे, लोकांनी तालांवच्या भीतीने का होईना धडाधड विशिष्ट कंपनीची हेल्मेट खरेदी करायची. काही दिवसांनी कारवाई थंडावली की हेल्मेट अडगळीत गेलीच! पुन्हा अपघात, पुन्हा रस्त्यांवर रक्ताचे सडे. केवळ हेल्मेट घातले म्हणून अपघात टळतील असेही नाही. रस्त्यांची स्थिती तर अजूनही वाईट आहे. खुद्द पणजीमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर खोदले गेलेले चर बुजवण्याची आठवण ना महापालिकेला होत, ना सार्वजनिक बांधकाम खात्याला. राजधानीत ही स्थिती असेल तर गावोगावी काय स्थिती असेल वेगळे सांगण्याची आवश्यकता नसावी. गतिरोधकांची मनमानीपणे केलेली उभारणी अपघात रोखण्याऐवजी अपघातांनाच आमंत्रण देत आलेली आहे. वाहतुकीतील बेशिस्त तर गोव्यात सवयीचीच होऊन गेलेली आहे. रस्त्यांच्या बाजूला अवैधपणे उभी राहिलेली बांधकामे, त्यांच्या पुढ्यात इतस्ततः उभी करून ठेवलेली वाहने, परिणामी रस्त्याची कागदावरील रुंदी आणि प्रत्यक्षात उपलब्ध रुंदी यांच्यातील तफावत, भर रस्त्यात प्रवासी घेण्या – उतरवण्यासाठी वाट्टेल तिथे थांबवल्या जाणार्या बसगाड्या, वाहनांचा भरधाव वेग, बसगाड्यांची रोज लागणारी शर्यत, मालवाहतुकीच्या रिक्षांनी केलेला वाहतुकीचा खोळंबा हे सगळे एवढे उबगवाणे आहे की कोणालाही नको हा प्रवास असे होऊन जावे. गोव्यातील वाहतुकीची ही स्थिती आता सुधारण्यापलीकडे गेलेली आहे. कोणालाही त्याचे सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. वाहतूक पोलिसांचे सारे लक्ष परप्रांतांतून येणार्या वाहनांना अडवून खिसे भरण्यात गुंतलेले दिसते. या सार्या बेशिस्तीवर अंकुश आणण्याची कोणाची तयारीच नसेल तर असे भीषण अपघात होणारच. केवळ हेल्मेट सक्तीही पुरेशी ठरणारी नाही. या समस्येच्या मुळाशी जावे लागेल. राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम असती तर प्रत्येकाला स्वतःच्या वाहनाने प्रवास करण्याची आवश्यकताच भासली नसती. परंतु सार्वजनिक व्यवस्थेचे तर तीनतेराच वाजलेले आहेत. बेशिस्त वाहतुकीमुळे मग अपघात ओढवतात. निरपराधांचे प्राण घेऊन जातात. वार्षिक रस्ता सुरक्षा सप्ताहाचे देखावे करण्यापेक्षा राज्याच्या समूळ वाहतूक व्यवस्थेचा कायापालट घडवून आणण्यावर विचारमंथन घडवून आणावे आणि कार्यवाहीचा प्रामाणिक प्रयत्न करावा.