किती ऐकावे सोशल मिडियाचे?

0
301
  • डॉ. मनाली पवार

केवळ माहितीच्या आधारे, आहारयोजना न करता… आपली प्रकृती काय आहे, आपण लहानाचे मोठे कुठे झालो, आपण राहतो तेथील भौगोलिक परिस्थिती काय, तेथे काय अनुकूल ठरेल, काय टाळावे लागेल, कोणत्या ऋतुमानानुरुप अग्निबल, धात्वाग्निबल, सात्मासात्म्यता या सर्व गोष्टींचा विचार आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने समजून घेणे व त्यानुसार आहारयोजना करणेच श्रेयस्कर होय.

प्रत्येकाने एकदा का होईना वैद्याकडे जाऊन स्वतःची प्रकृती काय आहे, आपल्यासाठी काय अनुकूल आहे, कोणत्या गोष्टी पूर्ण वर्ज्य कराव्यात, कोणत्या गोष्टी कधीतरी चालल्या तर चालतात, हे समजून घेणे आवश्यक असते.

सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व इतरही वेळी व्हॉटस्‌ऍप, फेसबुक, यू-ट्यूबगैरेंसारख्या सोशल मिडियांवर आरोग्यासंबंधी विविध माहिती प्रसारित होत असते. अमुक भाजी खा, तमुक फळे खा, याचा काढा प्या, एवढे पाणी प्या, एवढा वेळ व्यायाम करा… असे आणि तसे हे खा, ते टाळा, अमुक करा, तमुक करू नका, ह्या गोळ्या घ्या, ते औषध प्या, ते तेल वापरा, तो ज्युस प्या… एक नि हजार सल्ले व शेवटी सगळेच डॉक्टर सरसकट सगळ्यांसाठी एकच आहार-विहार अशा विविध सल्ल्यांची खैरात सोशल मिडियावर वाटलेली असते.

ह्या सल्ल्यांचे आचरण करण्यापूर्वी आयुर्वेदशास्त्र आहार-विहारासंबंधी काय सांगते ते पहा.

  • पाणी पिण्याचा नियम
  • व्हॉटस्‌ऍप, फेसबूक गुरु काय सांगतात?
    सकाळी उठल्यावर १ लीटर पाणी प्या. दिवसभरात किमान ३-४ लीटर पाणी प्या. चांगले पाणी उकळून फ्रिजमध्ये ठेवून प्या म्हणून सांगणारे आहेत व गरम-गरम घसा भाजेल इतके पाणी प्या सांगणारेही आहेत. मग आयुर्वेदशास्त्र काय सांगते पाण्याबद्दल…
  • पाणी शुद्ध करायला पाणी उकळणे हा सर्वांत श्रेष्ठ उपाय आहे.
  • थंडीच्या दिवसात, पावसाळ्यात, जेवताना पाणी गरम प्यावे. उन्हाळ्यात पाणी चांगले उकळून मातीच्या माठात साठवून प्यावे आणि हो लठ्ठपणासाठी चिकित्सा घेणार्‍यांनी पाणी नेहमी गरम-गरम प्यावेच. परंतु ऊठसूठ प्रत्येकाने पाणी पिताना फुंकर मारून प्यायची गरज नाही. तसेच व्यक्तीच्या प्रकृतीनुसार व ऋतुमानानुसार पाणी पिण्याचे तापमान व प्रमाण ठरवावे.
  • काही सोशल मिडियावरचे गुरु जेवताना पाणी पिऊच नका असा सल्ला देतात. पण आयुर्वेदशास्त्रानुसार जेवणाच्या मधे-मधे पाणी प्यावे. म्हणजे भात खाल्ल्यावर थोडे पाणी प्यावे. पोळ्या खाल्ल्यावर थोडे नंतर मधे हवे असेल तेव्हा घोटभर – उठताना एकदा आचमनासारखे पाणी प्यावे. ह्याने अन्नाचे पचन नीट होते. म्हणूनच जेवताना मध्ये-मध्ये पाणी प्यायल्यास पाण्याचा उपयोग अमृतासमान होतो.
    जेवणापूर्वी भरपूर पाणी प्यायले तर जेवण नीट जात नाही. जेवणानंतर पाणी प्यायल्यास अन्नामधून आहाररस पर्यायाने पुढचे धातू निर्माण होण्यास अडथळा येतो.
  • सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये सतत गरम पाणी पीत रहा, असे मार्गदर्शन चालू आहे. पण तसे पाहता आयुर्वेदशास्त्रामध्ये गरम पाणी काढ्याप्रमाणे पिणे ही तापांतील मुख्य चिकित्सा सांगितली आहे.
  • तोंडाला कोरड पडणे, म्हणजे तसेही शरीराची शक्ती कमी होत चालल्याचे लक्षण आहे. म्हणून नेहमी तहान लागल्यावर पाणी प्यावे. शरीराच्या मागणीप्रमाणे पाणी प्यावे.
  • आहारासंबंधी नियम –
    ज्या प्रदेशात जे पिकते ते खावे. ते आपल्या शरीराला सात्म्य असते. आपल्या ह्या कोकण प्रांतात भात पिकतो व तो आपल्या शरीराला मानवतो. मग गव्हाच्या पोळ्यांचा अट्टहास का? भाताने जाडी वाढते हा सार्वभौम विचार सगळ्यांसाठीच का? मधुमेहाच्या रुग्णांसाठी भात चालत नाही पण पाव, ब्रेड चालतात? इथे भात खाऊच नका किंवा भात अपायकारक म्हणण्यापेक्षा भात बनविण्याची पद्धत बदलली पाहिजे. पूर्वी सकाळ, दुपार- रात्री भात खाल्ला तरी तो पचायचा. कारण मेहनतीची कामे माणसांकडून व्हायची. मशीनवरची कामे कमी होती. भात करण्याची पद्धतही वेगळी होती. म्हणून आता तांदूळ कोणतेही असो, तो वर्षभर ठेवून नंतर भात करण्यापूर्वी भाजून घेतला व भांड्यात ठेवून शिजवून खाल्ला तर तो सरसकट सर्वांनाच मानवणारा असतो. त्यातही मधुमेही रुग्णांनी किंवा कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी भात शिजवताना वरची पेज काढून टाकणे अत्यंत गरजेचे असते.

सध्या केवळ सोशल मिडियावरील गुणगानामुळे ज्या फळांची, भाज्यांची नावेसुद्धा आपल्याला माहीत नव्हती ती फळे, भाज्या आपल्या घरात येऊ लागल्या आहेत. तसा आपला भारत देश कृषिप्रधान देश आहे. त्यातही भाज्यांबाबत तर अगदी समृद्ध. खरे तर आपल्याला परदेशी भाज्यांकडे आकर्षित व्हायचे काहीच कारण नाही. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे आपण जेथे राहतो, त्या जमिनीत, त्या ऋतुमानात जे पिकते ते खावे. आयुर्वेदात सर्व भाज्यांचे गुणधर्म, फायदे-तोटे दिलेले आहेत.

  • सामान्यतः आयुर्वेदामध्ये वेलीवर येणार्‍या फळभाज्यांची आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रशस्ती केलेली आहे.
  • कच्च्या भाज्या खाणे, भाज्यांचे रस काढून पिणे, फक्त पालेभाज्याच खाणे हे करण्यापूर्वी आयुर्वेदशास्त्र काय म्हणते ते पहा. पालेभाज्या आम्लविपक्ती म्हणजे शरीरात गेल्यावर आंबटपणा पर्यायाने पित्त वाढविणार्‍या असतात. तसेच रेषा व फायबर देणार्‍या असल्याने पचायलाही काहीशा जड असतात. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रामध्ये हितकर व योग्य मात्रेत पालेभाज्या खाव्यात असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या स्वच्छ धुवाव्यात, बारीक चिरू नयेत, जास्त अग्नीवर शिजवू नयेत. परत परत पालेभाजी गरम करू नये. असे नियमही सांगितले आहेत. तात्पर्य एवढेच की सरसकट नुसत्या पालेभाज्या खाणे प्रकृतीसाठी अवघड ठरू शकतात.
  • ब्रोकोली, पिवळी-लाल ढोबळी मिरची, नारंगी कोबी, बेबी कॉर्न, बटण मशरूम वगैरे गोष्टी नेहमीच्या भाज्यांपेक्षा अधिक मोबदला देऊन विकत घेतल्या जातात. ऑलिव्ह तेलात परतून अर्धवट कच्च्या स्वरूपात आवडीने खाल्ल्या जातात. हे सगळे आरोग्यदायी वाटते खरे, प्रसारही असाच केला जातो. ‘श्रीदेवी’ पण म्हणे फक्त ब्रोकोलीच खायच्या. परिणाम सगळ्यांना माहीत आहे. ब्रोकोली ही बेबी फ्लॉवर्सच्या जातीतील गड्‌ड्याच्या स्वरूपात येणारी भाजी. ती जमिनीतील रासायनिक खते, कीटकनाशके अधिक प्रमाणात शोषून घेते. शिवाय वातूळही आहे. कधीतरी खायला ब्रोकोली चालते, पण ती पथ्य म्हणून भाजी होऊ शकत नाही. ढोबळी मिरची तर मुळात मिरचीच. त्यातही ती वातवृद्धीही करते. ह्या भाज्या कधीतरी खाण्यासारख्या. मात्र सोशलमिडियावरील गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे रोज ग्रहण केल्यास त्याचे दूरगामी दुष्परिणाम नक्कीच दिसतील.

फळांच्या बाबतीतही तेच. आयुर्वेदाने त्या त्या ऋतूत हवामानात येणारी फळेच श्रेष्ठ सांगितली आहे. सातासमुद्रापलीकडील फळे आणण्यासाठी फळांवर ज्या प्रक्रिया केल्या जातात त्या आरोग्यास घातक असू शकतात. हायब्रीड फळे आकृतीने नैसर्गिक फळांपेक्षा खूप मोठी असतात. अशा फळांच्या सेवनाने धातुप्रीणवादी कार्ये घडू शकत नाहीत. काही वर्षांपूर्वी जपानमध्ये हायब्रीड कलिंगडाचे पीक काढले होते. त्यापासून आजार उत्पन्न होऊ लागल्याने सरकारने ते पीक पूर्णपणे नष्ट केले. चव घेण्यापुरती किंवा कधीतरी थोड्या प्रमाणात किवी, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट चाखणे वेगळे द्राक्षे, पपई अंजीर, डाळिंब वगैरे आपल्या भारतीय फळांऐवजी भलतीच फळे खाणे हे टाळणे तेवढेच आवश्यक आहे.

भारतात हजारो वर्षांपूर्वीपासून थंड प्रदेशाच्या देशांत मोहरी किंवा तिळाचे तेल, साधारण हवामानाचे देशात शेंगदाण्याचे तेल आणि उष्णता अधिक असलेल्या देशात खोबरेल तेल वापरण्याची परंपरा आहे. मात्र सध्या या सर्व पारंपरिक तेलांवर ऑलिव्ह ऑईल, सूर्यफूल तेल, करडईचे तेल यांनी मोठी गदा आणल्याचे दिसते. मात्र आयुर्वेदशास्त्रात दिलेले करडई तेलाचे गुणधर्म पाहिले तर त्याची वास्तविकता ध्यानात येईल. करडईचे तेल उष्ण वीर्याचे, तिखट विपाकाचे व पचायला जड असते. शरीरात दाह निर्माण करते व सर्व दोषांना प्रकूपित करते. सूर्यफुलाचे तेल करडईच्या तेलाप्रमाणेच उष्ण असते. त्यामुळे सूर्यफुलाचे तेलही रोजच्या वापरासाठी योग्य म्हणता येत नाही. विशेषतः उष्णतेचा, पित्ताचा त्रास असणार्‍यांनी पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी तसेच उष्ण प्रदेशात राहणार्‍यांनी हे तेल न वापरणेच चांगले असते. अमुक तेलाच्या वापरानेे हृदयविकार टाळता येतो… तेल ‘लाइट’ ‘चिपचिपाट’रहित कसे काय असू शकते? तेलाचा मुळात गुणच ‘स्निग्ध’ आहे. वेगवेगळ्या तेलांची जी जाहिरातबाजी होते ती अतिशयोक्ती वाटत नाही का?
अशा प्रकारे केवळ माहितीच्या आधारे, आहार योजना न करता आपली प्रकृती काय आहे, आपण लहानाचे मोठे कुठे झालो, आपण राहतो तेथील भौगोलिक परिस्थिती काय, तेथे काय अनुकूल ठरेल, काय टाळावे लागेल, कोणत्या ऋतुमानानुरुप अग्निबल, धात्वाग्निबल, सात्मासात्म्यता या सर्व गोष्टींचा विचार आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने समजून घेणे व त्यानुसार आहारयोजना करणेच श्रेयस्कर होय. त्यासाठी प्रत्येकाने एकदा का होईना वैद्याकडे जाऊन स्वतःची प्रकृती काय आहे, आपल्यासाठी काय अनुकूल आहे, कोणत्या गोष्टी पूर्ण वर्ज्य कराव्यात, कोणत्या गोष्टी कधीतरी चालल्या तर चालतात, हे समजून घेणे आवश्यक असते.