किंग्स पंजाबचा विजयी समारोप

0
97

>> चेन्नई सुपर किंग्सचा ६ गडी व १२ चेंडू राखून पराभव

सलामीवीर लोकेश राहुलचे दणकेबाज अर्धशतक आणि त्याला यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन याच्या लाभलेल्या साथीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात ६ गडी व १२ चेंडू राखून पराभव केला. चेन्नईने विजयासाठी ठेवलेले १७१ धावांचे माफक लक्ष्य पंजाबने १८ षटकांत गाठले. पंजाबचे या स्पर्धेतील आव्हान या सामन्यापूर्वीच संपुष्टात आले होते. त्यामुळे ‘प्ले ऑफ’मधील प्रवेशाच्या दृष्टीने या सामन्याला फारसे महत्तव नव्हते. पंजाबने १४.३ षटकांत लक्ष्य गाठले असते तर मात्र चेन्नईची तिसर्‍या स्थानी घसरण झाली असती व दिल्लीचा संघ दुसर्‍या स्थानी पोचला असता.

धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी पहिल्या गड्यासाठी १०८ धावांची भागीदारी केली. गेलने आपल्या आक्रमकतेला मुरड घालताना आपल्या शैलीला प्रतिकुल अशी फलंदाजी केली. शतकी भागीदारीत गेलचा वाटा केवळ २८ धावांचा होता. राहुलने चेन्नईच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. हरभजनने टाकलेल्या डावातील चौथ्या षटकात २४ धावा कुटून त्याने केवळ १९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या मोसमातील त्याचे हे सहावे व एकूण १६वे आयपीएल अर्धशतक होते. विशेष म्हणजे भज्जीने टाकलेल्या डावातील दुसर्‍या षटकात राहुलने दोन षटकार लगावूनही धोनीने हरभजनची गोलंदाजी सुरूच ठेवली होती. हरभजन सिंगने डावातील ११व्या षटकात या दोघांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. परंतु, तोपर्यंत सामना त्यांच्या हातातून निसटला होता.

या दोघांच्या पतनानंतर निकोलस पूरनने आपला आक्रमक खेळ दाखवला. संघ विजयासमीप असताना पूरन बाद झाला. मनदीप सिंग व सॅम करन यांनी नाबाद राहत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. चेन्नईकडून हरभजन सिंगने ३ तर रवींद्र जडेजाने १ बळी घेतला.

तत्पूर्वी, सलामीवीर फाफ ड्युप्लेसी (९६ धावा) व सुरेश रैना (५३) यांनी १२० धावांची मोठी भागीदारी करूनही चेन्नईला १७० धावांवर समाधान मानावे लागले. इंग्लंडचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज सॅम करनने शेन वॉटसनचा त्रिफळा उडवत चेन्नईला सुरुवातीलाच धक्का दिला. केवळ एका सामन्यात अर्धशतकी वेस ओलांडलेल्या वॉटसनची अपयशी मालिका कायम राहिली. वॉटसन बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीर फाफ ड्युप्लेसिस याने संयमी खेळी करत दमदार अर्धशतक ठोकले. अर्धशतकासाठी त्याने ३७ चेंडूंचा सामना केला. ड्युप्लेसिस पाठोपाठ सुरेश रैनानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३४ चेंडूत ही कामगिरी केली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रैना बाद झाला. त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावत ३८ चेंडूत ५३ धावा केल्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान रैनाने काल मिळविला. त्याचे हे ३८वे अर्धशतक ठरले. त्याने १९१ सामने खेळले आहेत. धवनच्या नावावर १५७ सामन्यांत ३७ अर्धशतके आहेत. सर्व खेळाडूंचा विचार केल्यास सनरायझर्सच्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर सर्वाधिक ४४ अर्धशतकांची नोंद आहे.

तुफान फलंदाजी करणार्‍या सलामीवीर ड्युप्लेसी याचे शतक केवळ ४ धावांनी हुकले. त्याने ५५ चेंडूत ९६ धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीमध्ये त्याने १० चौकार आणि ४ षटकार लगावले. आयपीएल कारकिर्दीतील त्याचे हे ११वे व यंदाच्या मोसमातील केवळ दुसरे अर्धशतक ठरले. यानंतर, अंबाती रायडू केवळ १ धाव करून माघारी परतला. मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. केदार जाधवला पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने त्रिफळाचीत केले. त्यामुळे चेन्नईला २० षटकात ५ बाद १७० धावापर्यंत मजल मारता आली. दरम्यान, केदार जाधवच्या खांद्याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्याने तो उर्वरित आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. वर्ल्डकपपूर्वी भारताला हो मोठा धक्का मानला जात आहे.

धावफलक
चेन्नई सुपरकिंग्स ः फाफ ड्युप्लेसी त्रि. गो. करन ९६, शेन वॉटसन त्रि. गो. करन ७, सुरेश रैना झे. शमी गो. करन ५३, महेंद्रसिंग धोनी नाबाद १०, अंबाती रायडू झे. मनदीप गो. शमी १, केदार जाधव त्रि. गो. शमी ०, ड्वेन ब्राव्हो नाबाद १, अवांतर २, एकूण २० षटकांत ५ बाद १७०
गोलंदाजी ः हरप्रीत ब्रार ३-०-२४-०, मोहम्मद शमी ३-०-१७-२, सॅम करन ४-०-३५-३, रविचंद्रन अश्‍विन ४-०-२३-०, अँडी टाय ३-०-३७-०, मुरुगन अश्‍विन ३-०-३३-०

किंग्स इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल झे. ताहीर गो. हरभजन ७१ (३६ चेंडू, ७ चौकार, ५ षटकार), ख्रिस गेल झे. शोरे गो. हरभजन २८, निकोलस पूरन झे. धोनी गो. जडेजा ३६ (२२ चेंडू, २ चौकार, ३ षटकार), मयंक अगरवाल झे. जडेजा गो. हरभजन ७, मनदीप सिंग नाबाद ११, सॅम करन नाबाद ६, अवांतर १४, एकूण १८ षटकांत ४ बाद १७३
गोलंदाजी ः दीपक चहर ४-०-२८-०, हरभजन सिंग ४-०-५७-३, ड्वेन ब्राव्हो ४-०-२७-०, इम्रान ताहीर ४-०-३६-०, रवींद्र जडेजा २-०-१६-१