काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन सोपे नाही : अनुपम खेर

0
9

>> इफ्फीत अहिरे दिग्दर्शित आगामी ‘धी सिग्नेचर’ सिनेमाचे प्रमोशन

पणजी : काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा काश्मिरमध्ये नेऊन त्यांचे तेथे पुनर्वसन करणे ही दिसते तेवढी साधी आणि सोपी गोष्ट नाही. एखादी वस्तू उचलून दुसर्‍या जागी ठेवण्यासारखे ते नाही, असे उद्गार सुप्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते व काश्मिरी पंडित अनुपम खेर यांनी काल इफ्फीस्थळी दै. ‘नवप्रभा’च्या प्रतिनिधीशी बोलताना काढले.

काल इफ्फीतील इंडियन पॅनोरमा विभागात अनुपम खेर अभिनीत ‘काश्मीर फाईल्स’ हा काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावरील चित्रपट दाखवण्यात आला. त्यानिमित्त चित्रपटाचा खेळ सुरू होण्यापूर्वी खेर यांचे ‘रेड कार्पेट’ वर स्वागत झाले. यावेळी दै. ‘नवप्रभा’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले होते, तो धागा पकडून त्यांना प्रश्‍न विचारला असता, त्यांनी वरील उद्गार काढले. काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन व्हायला हवे आणि ते कधी ना कधी तरी होणारच आहे; पण ही दिसते तेवढी सोपी गोष्ट नसल्याचा खुलासा खेर यांनी यावेळी केला. ‘मोदी है तो मुमकीन है’ असे म्हटले जाते, त्याविषयी खेर यांना विचारले असता, अशक्य असे काही नाही; पण त्यासाठी वेळ लागेल, असे ते म्हणाले.
आपण आतापर्यंत ५२५ चित्रपटांतून अभिनय केलेला असून, लवकरच आपला ‘धी सिग्नेचर’ हा गजेंद्र अहिरे दिग्दर्शित व के. सी. बोकाडिया निर्मित हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगत अनुपम खेर यांनी काल इफ्फीस्थळी गजेंद्र अहिरे यांच्यासह या चित्रपटाचे प्रमोशन केले. यावेळी त्यांना तुमच्या ‘सारांश’ या पहिल्या चित्रपटापासून ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटापर्यंत तुम्हाला आवडलेला तुमचा चित्रपट कोणता असे विचारले असता, हा प्रश्‍न तुम्ही मला आणखी ३० वर्षानंतर विचारा; कारण आणखी ३० वर्षांपर्यंत चांगल्या चित्रपटात आपणाला अभिनय करायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इफ्फीत काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावरील ‘काश्मीर फाईल्स’ हा तुम्ही अभिनय केलेला चित्रपट दाखवला जात आहे, त्याविषयी काय सांगाल असे विचारले असता ते म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या चित्रपटांपैकी तो एक महत्त्वाचा चित्रपट आहे. काश्मिरी पंडितांची ही कथा आणि व्यथा पडद्यावर मांडण्याची गरज होती आणि ती उशिरा का होईना पडद्यावर आल्याचे ते म्हणाले. हा चित्रपट अत्यंत वादग्रस्त ठरला त्याविषयी आपणाला काय वाटते, असे विचारले असता ते म्हणाले की, आज-काल प्रत्येक विषय हा वादग्रस्त ठरू लागलेला आहे. कोणी कोणत्या प्रश्‍नाविषयी वाद उकरून काढेल ते सांगता येत नाही.

गोवा हे इफ्फीसाठीचे सर्वात सुंदर स्थळ
गोव्यात होणार्‍या इफ्फीविषयी अनुपम खेर यांना विचारले असता, गोवा हे इफ्फीसाठीचे एक अत्यंत सुंदर असे स्थळ असून, इफ्फीसाठी याच्यापेक्षा चांगले स्थळ असूच शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. गोवा हा एक सुंदर प्रदेश असून, गोव्याची संस्कृती ही विविध संस्कृतींचे मिश्रण आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.