कायदा हाती घेणे गैर

0
57

पर्वरी येथील एका स्त्रीरोगतज्ज्ञाला मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी अखेर पोलिसांना शरण आला. मारहाणीच्या घटनेनंतर आरोपीला अटक होऊ न शकल्याने खासगी डॉक्टरांनी तसेच डॉक्टरांच्या संघटनेने त्याच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस स्थानकावर मोर्चा वगैरे नेला होता. अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न अपयशी झाल्याने संशयिताने स्वतःहून पोलिसांपुढे शरणागती पत्करली. या प्रकरणात डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकवार ऐरणीवर आला आहे आणि त्यांना कायद्याने संरक्षण पुरवले जावे ह्या मागणीनेही जोर धरला आहे.
डॉक्टर किंवा इस्पितळांवर रुग्णांच्या नातलगांनी हल्ले करण्याच्या, मारहाणीच्या घटना गोव्यालाही नव्या नाहीत. मुळामध्ये अशा घटनांमागे डॉक्टर आणि रुग्ण किंवा त्याचे नातलग यांच्यातील संवादाचा अभाव आणि प्रसंगपरत्वे निर्माण झालेले गैरसमज कारणीभूत असतात. आपली प्रिय व्यक्ती दगावल्याने रुग्णाचे नातलग आधीच शोकाकुल व उद्विग्न मनःस्थितीत असतात. त्यात डॉक्टरकडून बेफिकिरी झाल्याचा समज दृढ झाल्यास मग काही लोक संयम सुटल्याने असे गैरप्रकार करण्यास प्रवृत्त होतात, परंतु अशा प्रकारे स्वतःहून कायदा हाती घेणे पूर्णतः चुकीचे आहे आणि त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही.
प्रस्तुत प्रकरणात संशयिताने आपण सदर डॉक्टरला का मारहाण केली त्याची कारणे दिली आहेत. आपल्या बहिणीच्या बाळाच्या मेंदूत दोष होता, परंतु सदर डॉक्टरने मुलाच्या ह्रदयात दोष असल्याचे सांगितले. आपल्याकडून उपचार होणार नाही हे दिसताच म्हापशाच्या खासगी इस्पितळात न्यायला लावले. तेथील डॉक्टरांनी गोमेकॉत बाळाला गोमेकॉत न्यायला सांगितले. ह्या सगळ्या धावपळीत बाळ दगावले. बाळात नेमका काय दोष आहे हे सांगितले गेले असते व त्याला वेळीच गोमेकॉत न्यायला लावले असते तर कदाचित ते वाचू शकले असते, त्यामुळेच संतापाच्या भरात आपण सदर डॉक्टरला थप्पड लगावल्याचे ह्या तरुणाचे म्हणणे आहे. अशा प्रकरणांत डॉक्टरांची एक बाजू असते आणि रुग्णांची, त्यांच्या नातलगांची दुसरी बाजू असते. बहुधा दोन्हीही आपापल्या बाजूने बरोबर असतात. परंतु डॉक्टरने बेफिकिरी केल्याच्या गैरसमजातून अशा मारहाणीच्या घटना घडतात. प्रस्तुत प्रकरणामध्ये एखाद्याने कायदा हाती घेऊन डॉक्टरला मारहाण करणे सर्वस्वी गैर आहेच, परंतु त्याच बरोबर संबंधित डॉक्टरकडून काही चूक किंवा गलथानपणा झाला का ह्याची चौकशी करणे ही देखील त्याच्या बाजूने उभ्या राहणार्‍या डॉक्टरांच्या संघटनेची तितकीच जबाबदारी आहे. केवळ आपला व्यवसायबंधू आहे म्हणून चुकांवर पांघरूण घातले जाऊ नये.
डॉक्टरी पेशा हा शिक्षकी पेशाप्रमाणेच समाजामध्ये एकेकाळी अत्यंत आदराचे स्थान असलेला पेशा. दुर्दैवाने आजकाल हा आदर आणि आस्था लोप पावत चालली आहे. खरे तर सध्याच्या कोवीडच्या महामारीमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता ज्या प्रकारे जनतेला सेवा दिली ती निव्वळ अतुलनीय आहे. त्यामुळे वैद्यकीय पेशातील मंडळींचे कौतुकही झाले. परंतु एखादी अशी घटना घडली की हे कौतुक, हा आदराचा देखावा बाजूला पडतो आणि अनादराची भाषा डोके वर काढताना दिसते. कोणत्याही पेशामध्ये काळेगोरे असणारच. परंतु त्यामुळे प्रत्येक डॉक्टरकडे संशयाने पाहणे, त्याच्याविषयी अविश्वास व्यक्त करणे चुकीचे आहे. आपले कर्तव्य निभावत असताना एखाद्याचे रुग्णासंबंधीचे अनुमान चुकू शकते. परंतु ते काही जाणूनबुजून केलेले नसते. आपला रुग्ण दगावावा, त्याला इजा व्हावी असा विचार कोणताही डॉक्टर करणार नाही. त्यामुळे अशा गोष्टींबाबत रुग्णांच्या नातलगांनी संयम पाळणे आणि आवश्यक वाटत असेल तर संबंधिताविरुद्ध कारवाईसाठी वैधानिक माध्यमांचा आधार घेणेच योग्य ठरेल.
वैद्यकीय पेशामध्ये गैरगोष्टी घडत नाहीत असे म्हणणेही आजच्या काळात धाडसाचे ठरेल. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये आजकाल कॉर्पोरेट संस्कृती आलेली आहे, त्यातून वैद्यकीय सेवेच्या आधुनिकीकरणाबरोबरच रुग्णांचे आर्थिक शोषण होताना दिसते. रुग्णाला वैद्यकीय विमा कवच असल्याचे दिसताच बकरा कापावा तसे रुग्णाचे आर्थिक शोषण करण्याचे प्रकार सर्रास होतात हे नाकारता येत नाही. औषध कंपन्यांकडून मिळणार्‍या भेटी आणि त्यांच्या प्रायोजकत्वावर केले जाणारे दौरे, परिषदा आदींसारख्या गैरप्रकारांवरही अनेकदा समाजाकडून बोट ठेवले जाते.
या पेशाप्रतीचा समाजातील आदरभाव टिकवायचा असेल तर ह्या क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या पेशातील अशा गैरगोष्टींविरुद्धही आवाज उठवायला हवा. ‘वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर | यमस्तु हरति प्राणान्, वैद्य प्राणान् धनानिच ॥ म्हणजे यम केवळ प्राणच हरण करतो, पण वैद्य प्राण आणि धन दोन्ही नेतो हे संस्कृत सुभाषितकारांचे वचन विनोद म्हणून ठीक आहे, परंतु डॉक्टर ह्या संस्थेविषयीचा आदरभाव टिकायला हवा असेल तर वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनीही तो टिकवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील.