काजळ कथा

0
124
  • प्राजक्ता प्र. गावकर
    (नगरगाव)

बाळाला तेल लावतेवेळी, डोळ्यात काजळ घालतेवेळी तो देव समोर फणा काढून बसलेला असायचा. त्याला पाहून तिला घाम फुटायचा. ‘हा आपल्या बाळाला दंश तर करणार नाही ना?, असे तिला राहून राहून वाटायचे.

वार्षिक परीक्षा पार पडली आणि कुठेतरी फिरायला जायचे वेध लागले. आम्ही सहकुटुंब पर्यटन करायला निघालो. आम्ही चार माणसे. मी, माझे पती आणि दोन मुले. बेळगावला जायचा बेत केला तसे माझे पती पर्यटन महामंडळाच्या बसची तिकिटे घेऊन आले.

सर्व तयारीनिशी आम्ही पणजीला पोहोचलो. तिथून आमची बस सकाळी नऊ वाजता सुटली. ही बस आंबोलीमार्गे बेळगावला जाणार होती. बरोबर दुपारी बारा वाजता आम्ही आंबोली घाटात पोहोचलो. मुले बाहेरचा निसर्ग पाहण्यात गर्क होती. आम्ही दोघे नवरा बायको बोलत होतो. मुलांचे ऐकत हो… हो.. करत होतो.
बस घाट चढत होती. खूप भयानक रस्ता, एका बाजूला खोल दरी आणि दुसर्‍या बाजूला उंच उंच डोंगर. समोरून गाडी असली तर पाचावर धारण बसलीच म्हणून समजा. अक्षरशः जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागते. तर अशा या घाटातून जाताना अचानक ड्रायव्हरने करकचून ब्रेक लावले.

काय झाले? म्हणून जो तो उठून पाहू लागला. मी व माझे पतीही खाली उतरून पाहायला गेलो. पाहतो तर काय, एक नऊ फुटी नागराज भर रस्त्यात वेटोळे घालून बसला होता. सर्वजण त्याला डोळे फाडून बघत राहिले. घाबरून गेले. तो मात्र आपला फणा फुलवून डोलत होता.

कुणी म्हणाले की, ‘काहीतरी चुकले असेल म्हणून दिसला’, कुणी म्हणाले चुकून रस्त्यावर आला असेल.’ एक वृद्ध गृहस्थ म्हणाले, ‘ते काहीही असो व्यवस्थित घाट चढून गेल्यावर देवाला वाहण्यासाठी मी हार आणि नारळ आणला आहे. तो हार याच देवाच्या गळ्यात घाल आणि नारळ वाढव व आम्हाला सुखरूप घाट चढवून ने म्हणून साकडे घाल. तिथे पोहोचल्यावर आपण नागनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेऊ’.

हे ऐकल्यावर ड्रायव्हरने त्यांनी सांगितल्याप्रमाणे हार त्या नऊ फुटी नागदेवतेच्या दिशेने फेकला. तो बरोबर त्याच्या गळ्यात पडला. त्यानंतर नारळ वाढवला, त्याची एक वाटी बरोबर त्या नागदेवतेच्या वेटोळ्यात जाऊन पडली. सर्वांनी नमस्कार केला. तसा तो धिम्या गतीने बाजूला जाऊ लागला. तेवढ्यात माझे लक्ष त्याच्या फण्याकडे गेले. आश्‍चर्याने मी पाहतच राहिले. त्याच्या डोळ्यात काजळ घातले होते. मी माझ्या पतीला ते दाखवले. त्यांनासुद्धा नवल वाटले. ते मला म्हणाले, ‘दुसरे नवल बघ तरी, त्याच्या फण्यावर तेल घातल्यासारखे दिसते. कमाल आहे.’
नंतर आम्ही सावकाश घाट चढून चंदगड तालुक्यात पोहोचलो. एक चांगले हॉटेल पाहून ड्रायव्हरने गाडी थांबवली व सर्वांना सांगितले की, ‘दहा मिनिटे बस थांबणार आहे. तेव्हा सर्वजण फ्रेश व्हा.’ आम्ही खाली उतरलो व त्या वृद्ध गृहस्थाने आम्ही कोण व कुठून आलो याची चौकशी केली. माझ्या पतीने सांगितले, ‘आम्ही गोव्याहून आलो आहोत. पर्यटनासाठी इथे पाहण्यासारखी स्थळे कुठली आहेत?’ असा प्रश्‍नही केला.

तेव्हा ते म्हणाले, ‘आज काजळपूरला जत्रा आहे. तुम्ही तिथे जाऊन देवाच्या पाया पडून जा. ते ठिकाण इथून दोन किलोमीटरवर आहे.’
त्या गृहस्थाकडे मी बारकाईने पाहिले, तर त्याच्या डोळ्यात काजळ होते आणि डोक्यावर थपथपून तेल घातले होते. थोड्या वेळाने तो वृद्ध गृहस्थ उठून उभा राहिला आणि मी एकदम चाटच पडले. कारण तब्बल नऊ फूट लांब होता तो गृहस्थ. आम्ही ड्रायव्हरला बस काजळपूरला घ्यायला सांगितली.

बस काजळपूरला पोहोचली. आम्ही देवळाचा पत्ता विचारत गेलो. लोकांची वर्दळ होती. विशेष करून बायका पूजेचे साहित्य घेऊन देवळाकडे चालल्या होत्या. त्यात प्रत्येकाच्या तबकात काजळाची डबी होती, तेल होते. आम्ही पण देवळात गेलो. देवळात नागनाथाची मूर्ती होती.

बायका त्याच्या फण्यावर तेल घालत होत्या व डोळ्यात काजळ घालत होत्या. आम्हीपण पूजा केली. फण्यावर तेल घातले व डोळ्यात काजळ घातले. हळदकुंकू वाहून नमस्कार केला.
देवळात हीऽऽ गर्दी होती. कसे बसे देवळातून बाहेर आलो. आता जत्रा म्हटल्यावर मुले काय गप्प बसणार? त्यांना जत्रेतली दुकाने, पाळणे सर्वच खुणावत होते. मला म्हणाली, ‘आई, तू बस इथेच आम्ही बाबांबरोबर जत्रा फिरून येतो.’ त्यांचा तो उत्साह पाहून मी म्हटले, ‘बरे, पण लवकर या. नाहीतर बस सुटायची’. मुले मजेत निघून गेली.

मी तिथेच देवळाच्या कट्‌ट्यावर बसले. इथे जास्त गडबड, गोंधळ नव्हता. शांतपणे मी जत्रा न्याहाळत बसले होते. तेवढ्यात माझ्या शेजारी कुणीतरी म्हातारे बाबा बसल्याचे जाणवले. मी पाहिले तर ते बाबा माझ्याकडे स्मित हास्य करत पाहत होते. मी त्यांना नीट पाहिले. ते आपल्या डोक्यावरचे तेल एका फडक्याला पुसत होते आणि डोळ्यांतले काजळ सुद्धा. मी त्यांना नवल वाटून विचारले, ‘काजळ का घातले?’
तेव्हा ते म्हणाले की, ‘त्याची एक फार मोठी कहाणी आहे. ती मी तुला सांगतो. ऐक, या गावात एक गरीब नवरा बायको राहत होती. त्यांना मुलाची ओढ होती. पण दोघांना खायला काहीच नाही मिळायचे. त्यात तिसर्‍याला काय घालायचे म्हणून त्यांनी मूलच होऊ दिले नाही. शेवटी निसर्गाचा चमत्कार होऊन त्या बाईला दिवस गेले. ती दोघे ह्या नागनाथाची भक्ती करत असत. सर्व सुरळीत चालले असताना गावात तापाची साथ आली आणि त्या बाईचा एकुलता एक आधार, तिचा पती त्या साथीत वारला.
त्या बाईला काहीच सुचेना. पोटात मूल होते म्हणून जीव द्यायला तिला धीर होत नव्हता. तशीच ती जगत होती. आता तिचे दिवस पूर्ण भरत आले. एक दिवस ती लाकडे आणायला जवळच्या डोंगरात गेली असताना तिला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. त्यावेळी तिथे लहानशी देवळी होती. पण नागनाथ जागृत होता. ती इथे बसली आणि देवाला हाका मारू लागली. वेदनेने कळवळू लागली. तेव्हा नागनाथ प्रकटला व तिला सावरू लागला. ती म्हणत होती, ‘देवा मला आणि माझ्या बाळाला वाचव. माझ्या बाळाच्या टाळूवर जसे मी तेल घालीन तसे तुझ्यापण टाळूवर घालीन. माझ्या बाळाच्या डोळ्यात जसे काजळ घालीन तसे तुझ्यापण डोळ्यात घालीन. पण मला वाचव.’’ असे म्हणून ती विव्हळू लागली. तेव्हा दया येऊन नागनाथाने तिची सुटका केली व परत आपल्या जागेवर जाऊन बसला. त्या बाईला मुलगा झाला. ती बाई शुद्धीवर येऊन आपल्या तान्हुल्याला घेऊन घरी गेली.

असेच काही दिवस गेले. ती बाई आता घरकाम करू लागली होती. बाळाला तेल लावतेवेळी डोळ्यात काजळ घालतेवेळी तो देव समोर फणा काढून बसलेला असायचा. त्याला पाहून तिला घाम फुटायचा. ‘हा आपल्या बाळाला दंश तर करणार नाही ना?, असे तिला राहून राहून वाटायचे.

पण तो काहीच करत नव्हता. तो थांबून थांबून वाट पाहायचा की ती आता आपल्याला डोक्यावर तेल घालील व डोळ्यात काजळ घालील, पण त्या बाईला आपण बोललेल्या नवसाची आठवणच नव्हती. शेवटी तिने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी जवळ काठी ठेवून बसायचे ठरविले.

तिच्या मनातले नागनाथाला समजले व त्याने बाळाला लावायचे तेल व काजळाची डबी आपल्या वेटोळ्यात घेऊन ठेवली. त्या बाईने त्याच्याकडे पाहिले तर त्याचे डोळे लाल भडक दिसत होते. रागाने तोंडातून फूत्कार बाहेर पडत होते. तेव्हा तिने भांड्यात दूध घालून त्याच्यासमोर ठेवले. पण त्या दुधात तिला आपल्या प्रसूतीच्या वेळचा प्रसंग दिसला.

तशी तिला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिने पटकन त्या देवाची क्षमा मागितली व अभय मागितले. जवळच झोपलेल्या आपल्या बाळाच्या टाळूला तिने तेल घातले व डोळ्यात काजळ घातले. तसेच त्या देवाला तिने आपल्या मांडीवर बसायला सांगितले. तसा तो नऊ फुटी नागनाथ तिच्या मांडीवर जाऊन झोपला. तेव्हा तिने त्याच्या फण्याला तेल लावले व त्याच्या डोळ्यात काजळ घातले. तो आनंदाने डोलू लागला. अशा तर्‍हेने त्याने तिचा नवस फेडून घेतला. हां हां म्हणता ही बातमी सर्व गावभर पसरली. तेव्हापासून या गावचे लोक या नागनाथाच्या फण्यावर तेल घालतात व डोळ्यात काजळ घालतात आणि या दिवशी इथे जत्रा भरते. कुणाचे नवस बोललेले ते इथे याच दिवशी फेडले जातात. एवढे सांगून ते बाबा जरा थांबले. तेवढ्यात मुले आली व म्हणाली,‘आई, चल बाबा बोलावतात. बस सुरू झाली. मी उठले. मी वाकून त्या वृद्ध बाबांच्या पाया पडले. त्यांचा आशीर्वाद घेतला व निघाले. बसजवळ पोहोचताच मी सहज मागे वळून पाहिले तर ते दृश्य पाहून सर्रकन माझ्या अंगावर काटा उभा राहिला. काय होते ते दृश्य? मघाशी माझ्याशी गप्पा मारणारे ते गृहस्थ उभे राहिले, तर ते नऊ फूट उंचीचे होते. बोलता बोलता मी त्यांना देवळात लोक खूप गर्दी करतात. त्यामुळे मी इथूनच येतो जातो’ असे म्हणून त्यांनी एके ठिकाणी अंगुली केली. तिकडे मी पाहिले तर मला आश्‍चर्य वाटले की एवढ्याशा बिळातून हे गृहस्थ कसे काय जातात? कारण जेमतेम एक मांजराचे पिल्लू जाईल एवढे लहान बिळ होते ते त्या भिंतीला आणि आता मी पाहते तर… त्या नऊ फुटी गृहस्थाचे रूपांतर नऊ फुटी नागराजामध्ये झाले होते व तो आपल्या जवळच्या फडक्याला आपले तोंड पुसत होता. डोळे पुसत होता व त्या बिळातून देवळाच्या गाभार्‍यात जात होता. हे सर्व पाहून मला घामच फुटला. तोंडातून शब्दच फुटेनात… मी मनोमन त्या देवाला नमस्कार केला व बसमध्ये चढून बसले. बस सुटली…