कांदोळी येथे वद्धाची हत्या

0
14

>> वृद्धाची कार घेऊन संशयिताचे पलायन

कांदोळी येथील अरनॉल्ड सुवारीस (60) यांचा अज्ञाताने खून करून त्यांची कार पळवून ती सिकेरी येथील हेलिपॅडवर ठेवल्याची घटना काल रविवारी पहाटे 2.35 च्या दरम्यान घडली. पहाटे सहाच्या दरम्यान या घराचा पुढील दरवाजा सताड उघडा होता व अरनॉल्ड सुवारीस हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याचे शेजाऱ्यांना दिसून आले. या खुनामागचे कारण समजू शकले नाही.

घराच्या छपराची कौले काढलेली असल्याचे आढळून आले असून संशयित छपरावरून घरात आला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कश्यप कौशल यांनी घटनास्थळी काल संध्याकाळी पाचच्या दरम्यान उपस्थिती लावून पाहणी केली. या हत्येमागे कुणाचा हात आहे, त्याचा शोध काढण्यासाठी एका पथक तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अलनॉल्ड यांची कार सिकेरी येथे आढळली असून ती जप्त करण्यात आलेली आहे. अरनॉल्ड यांच्या घरात व गाडीतही रक्त सांडले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कौशल यांनी दिली.

अरनॉल्ड हे अविवाहित असून ते कॅनडा येथे रहात होते. या घरी अधूनमधून येत असत. सोबत त्यांचे भाऊ व मित्रही येत असत.
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी, अरनॉल्ड हे गोव्याचेच असून ते काही वर्ष कॅनडामध्ये होते. वर्षातून एकदा गोव्यात येत होते. सध्या ते गोव्यातच होते. संशयिताने घराची कौले काढून आत प्रवेश केला व त्यांचा खून केला. घरामध्ये नायलॉनची दोरीही सापडली असल्याचे सांगून, या घटनेत दोन संशयित असावेत असा अंदाज लोबो यांनी व्यक्त केला.