कळंगुटमध्ये मोबाईलवरून परप्रांतीय कामगाराचा खून

0
152

कळंगुट मासळी बाजारात मोबाईलच्या खरेदीवरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन खुनात झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या घटनेत शमशाद मलिक (३५, उत्तर प्रदेश) या खून झाला असून तो कळंगुटमध्ये एका खाजगी आस्थापनात कामावर होता. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी सहभागी १७ जणांना ताब्यात घेतले आहे.

कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील खाजगी शॅकवर वेटरचे काम करणार्‍या सुमीत जैस्वाल (२३) व त्याचा सहकारी असलेल्या शमशाद मलिक यांच्यावर रविवारी मध्यरात्री १७ जणांच्या टोळक्याने लोखंडी पाईप तसेच लाकडी दंडुक्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात तक्रारदार सुमीत जैस्वाल व शमशाद मलिक हे जबर जखमी झाले. मात्र, शमशाद मलिक हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, शमशाद मलिक याने हल्लेखोरांतील एकाकडून नवीन मोबाईल खरेदीसाठी २५०० रुपयांची रोख रक्कम दिली होती तथापि पैसे घेऊनही मोबाईल संच ताब्यात न मिळाल्यामुळे शमशादने मोबाईल विक्रेत्या संशयितास जाब विचारला होता. त्यातून सहकारी मित्रांच्या मदतीने हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सध्या या खूनप्रकरणात एकूण १७ परप्रांतीय तरुणांना स्थानिक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून तपास चालू आहे. पोलिसांनी शमशाद याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला आहे.