कळंगुटमध्ये दोन शॅक्स खाक; ८० लाखांचे नुकसान

0
11

कळंगुट समुद्रकिनारी मंगळवारी पहाटे दोन शॅक्सना आग लागून सुमारे ८० लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटे २.३० च्या सुमारास मनोज नाईक आणि बेनेडिक्ट रॉड्रिग्ज यांच्या मालकीच्या सँड बार शॅक आणि बे वॉच शॅकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात हे दोन्ही शॅक्स खाक झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग पसरली आणि काही वेळातच आगीने दोन्ही शॅक्सना वेढले. यावेळी दोन्ही शॅक्समधील कर्मचार्‍यांनी त्यांचे काही फर्निचर वाचवण्यात यश मिळवले; परंतु सजावटीचे सामान, विद्युत उपकरणे, संगीत यंत्रणा, फ्रिज आणि इतर वस्तू पूर्णपणे जळून नष्ट झाल्या. या घटनेत रॉड्रिग्ज यांचे अंदाजे ३० लाखांचे नुकसान केले, तर नाईक यांचे अंदाजे ५० लाखांचे नुकसान झाले.

कोविडमुळे मधल्या काळात कोणताही व्यवसाय नसल्यामुळे या वर्षी आम्ही पुन्हा शॅक व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप पैसे खर्च केले होते आणि आता या आगीच्या घटनेने आमच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. आम्ही सर्व काही गमावले आहे, असे बेनेडिक्ट रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सकाळी घटनास्थळी धाव घेतली आणि शॅक्समालकांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्यासह पंच सदस्यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि पीडित शॅकमालकांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.