नगरनियोजन कार्यालयाबाहेर निदर्शने; कलम त्वरित मागे घेण्याची मागणी
पाटो-पणजी येथील नगरनियोजन कार्यालयाच्या बाहेर नागरिकांनी काल निदर्शने करत नगरनियोजन कायद्यातील 39(अ) च्या समावेशाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जमीन रुपांतर करण्यास मान्यता देणारे हे कलम त्वरित मागे घेण्याची मागणी नागरिकांनी केली.
गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगरनियोजन कायद्यात दुरुस्ती करून नवीन 39(अ) या नवीन कलमाचा समावेश करण्यात आला आहे. त्यावेळी विरोधी आमदारांनी या कलमाला विरोध दर्शवल्याने सभागृहात मोठा गदारोळही झाला होता. त्यावेळी विरोधी पक्षांच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले होते.
काल झालेल्या निदर्शनामध्ये आपचे आमदार क्रूझ सिल्वा, आरजीचे आमदार विरेश बोरकर, धीरेंद्र फडते, काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व इतरांनी सहभाग घेतला.
राज्यातील जमीन भावी पिढीसाठी टिकवून ठेवण्यासाठी जमिनीचे संवर्धन करण्याची गरज असून, नगरनियोजन कायद्यात करण्यात आलेली दुरुस्ती त्वरित मागे घेण्याची मागणी निदर्शकांनी केली.
नगरनियोजन कायद्यात 39(अ) च्या समावेशाच्या विरोधात निदर्शने केल्यानंतर नागरिकांनी नगरनियोजन खात्याचे मुख्य नगरनियोजक राजेश नाईक यांना एक निवेदन सादर केले.