कर्नाटक आघाडी सरकारवरील धोका कायम

0
82

>> बंडखोर आमदार राजिनाम्यांवर ठाम : भाजपकडून विश्‍वासमताची मागणी

सत्ताधारी कॉंग्रेस व जेडीएसच्या आमदारांच्या बंडाळीमुळे कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या कुमारस्वामी सरकारला सावरण्यासाठी या आघाडीतर्फे कालही शर्थीचे प्रयत्न केले गेले. मात्र बंडखोर आमदारांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही. सध्या बंडखोर आमदारांचा मुक्काम मुंबईत असून त्यांनी आपल्या राजिनाम्यांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान विरोधी भाजपने आघाडी सरकारने बहुमत गमावल्याचा दावा करून कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजिनामा द्यावा किंवा आज सोमवारीच विधानसभेच्या पटलावर विश्‍वासमत अजमावावे अशी मागणी केली आहे.
सत्ताधारी आघाडीतील कॉंग्रेसचे १३ व जेडीएसचे ३ मिळून १६ जणांनी राजिनामे सादर केल्यामुळे कॉंग्रेस-जेडीएसचे सरकार अल्पमतात आले आहे. मात्र या बंडखोर आमदारांचे राजिनामे स्वीकारण्यात आलेले नाहीत.
याबरोबरच सरकार सावरण्यासाठी मंत्रिपदे बहाल केलेल्या दोन अपक्ष आमदारांनीही राजिनामे दिलेले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर राजिनामा दिलेले कॉंग्रेसचे आमदार एम. टी. बी. नागराज हे मुंबईहून बंगळुरुत आले होते. व त्यांच्याशी काल दिवसभर कॉंग्रेस नेत्यांनी चर्चा करून त्यांना राजिनामा मागे घेण्याची विनवणी केली. मात्र त्याबाबत प्रतिसाद न देता नागराज हेही मुंबईला रवाना झाल्यामुळे कॉंग्रेसच्या वाट्याला निराशा आली.
मुंबईत पोचल्यानंतर नागराज यांनी राजिनामा मागे घेण्याचा प्रश्‍नच नाही असे पत्रकारांना सांगितले. आपण राजिनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे ते म्हणाले. मात्र बंगळुरूहून निघण्याआधी तेथील पत्रकारांना त्यांनी सांगितले की आपण आमदार के. सुधाकर यांच्याशी बोलून राजिनाम्याबाबत अंतिम निर्णय घेणार त्या दोघांनीही गेल्या १० जुलै रोजी एकाच वेळी राजिनामे दिले होते. मात्र सुधाकर यांच्याशी गेल्या दोन दिवसांपासून संपर्क होत नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
मात्र काही वेळ कॉंग्रेस नेत्यांना आशेचा किरण दाखविल्यानंतर नागराज भाजप नेते आर. अशोक यांच्यासह विमानात चढतानाचे दृश्य स्थानिक टीव्ही चॅनल्सवर प्रसारीत झालेले दिसून आले.

या सर्व कारस्थानामागे भाजप नेते असल्याचा आरोप मंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी आमदार रामलिंग रेड्डी यांच्याकडेही चर्चा केली. मात्र रेड्डी यांनी आपण आपली भूमिका आज दि. १५ रोजीच स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.

२२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेत कॉंग्रेसचे ७८ व जेडीएसचे ३७ आणि एक बसप आमदार मिळून ११६ आमदार आहेत. त्यापैकी कॉंग्रेसच्या १३ व जेडीएसच्या ३ आमदारांनी राजिनामे दिले आहेत. तर विरोधी भाजपचे २ अपक्षांसह १०७ असे संख्याबळ आहे. १६ आमदारांचे राजिनामे स्वीकृत झाल्यास सत्ताधारी आघाडीचे संख्याबळ १०० वर घसणार आहे.